महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीची श्रद्धांजली
स्थैर्य, सातारा दि. 6 : केवळ मराठीच नाही तर आपण इतरही भाषेत चांगले वृत्तपत्र काढू शकतो व ते महाराष्ट्रभर विस्तारु शकतो हे आपल्या कृतीतून सिद्ध करणारे दैनिक पुण्यनगरीचे संस्थापक मुरलीधर (बाबा) शिंगोटे होते. त्यांचा हा कष्टमय जीवनाचा प्रवास मराठी माणसाला प्रेरणादायी ठरेल अशा शब्दांत महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी फलटण साताराचे वतीने अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ व कार्यकारी विश्वस्त विजय मांडके यांनी मुरलीधर बाबा शिंगोटे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
आपल्या श्रद्धांजलीपर निवेदनात रवींद्र बेडकिहाळ व विजय मांडके यांनी म्हटलं आहे की मुरलीधर बाबा शिंगोटे यांचे आज दुपारी वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले. दैनिक पुण्यनगरी, आपला वार्ताहर, मुंबई चौफेर, कर्नाटक मल्ला या वर्तमानपत्राचे चे संस्थापक मुरलीधर बाबा शिंगोटे होते. कष्टकरी, जनसामान्यांना काय हवंय यांची नस शिंगोटे बाबा यांनी ओळखली होती.
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे वतीने त्यांच्या मराठी वृत्तपत्र सृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जेष्ठ संपादक पुरस्कार देऊन सन्मानित करता आले. त्यांनी हा पुरस्कार पोंभुर्ले येथील जांभेकर सभागृहात एका समारंभात स्विकारला होता. आज मराठी वृत्तपत्रसृष्टी एका कठिण प्रसंगाला सामोरे जात असताना मुरलीधर (बाबा) शिंगोटे यांच्यासारख्या उपक्रमशिल व कष्टकरी कामगार शेतकरी शेतमजूर यांची जाण असलेला व अनेक तरुण पत्रकारांचे संसार उभे करणारे बाबांचे निधनाने पुण्यनगरी परिवारावर कोसळलेल्या दु:खात आम्ही सहभागी आहोत असे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, उपाध्यक्ष बापुसाहेब जाधव व कृष्णा शेवडीकर आणि कार्यकारी विश्वस्त विजय मांडके यांनी श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले आहे.