बाबांनी रोजी-रोटी अन डोळ्यांचे वरदान देऊन पुन्हा जग दाखवलं…
वर्ष होतं 2002… वाई मधील तांबडी माती सप्ताहिकामध्ये 2 वर्षे काम केल्यावर काही चांगल्या-वाईट अनुभवांची शिदोरी घेऊन वयाच्या 20व्या वर्षी साताऱ्याकडे रोजी-रोटीसाठी वळलो. वयाच्या 20व्या वर्षापर्यंत नियतीने अनेक जिव्हारी लागणारे घाव दिले होते. अशा घायाळ मनाने साताऱ्यातील काही दैनिकांच्या कार्यालयाना कामासाठी भेटी दिल्या. एका दैनिकात डीटीपी विभागात काम मिळालं. तिथं काम करीत असतानाच एका पत्रकार मित्रानं साताऱ्यात नवीन दैनिक पुण्यनगरी सुरू होणार असल्याची माहिती दिली व तिथे कामासाठी भेटण्याचा सल्ला दिला. इथल्यापेक्षा थोडा वाढवून पगार भेटला तर पुढचं ठरवू असं मनाशी ठरवून मी मित्राने सांगीतलेल्या ठिकाणी गेलो. ऑफिसचं काम सुरू होतं. काम सुरू असलेल्या ठिकाणी एका कामगारास भेटण्यासंबंधी विचारल्यावर त्याने मला तेथील व्यवस्थापक रमेश गायकवाड यांच्यापर्यंत पोहोचवले. गायकवाड नाव ऐकल्यावर जीव थोडा हलका झाला. भेटल्यावर त्यांनी मला अर्ज व बायोडाटा मागितला. थोड्याशा गोंधळलेल्या मनस्थितीत त्यांना मी फक्त भेटण्यासाठी व माहिती घेण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी थोडंसं माझ्याकडे दुर्लक्ष करीत कोणत्याही कामासाठी भेटण्याचे असल्यास अर्ज व बायोडाटा घेऊन येण्याबाबत सांगितलं. मी उठून जाणार तेवढ्यात एक भारदस्त आवाज कानावर आला, अरे रमेश कोण आलंय भेटाय… बाबा, एक मुलगा नोकरीसाठी विचारपूस करतोय. बाबांनी सांगितलं, रमेश त्याला आतमध्ये पाठव. हे ऐकल्यावर व्यवस्थापकांनी मला आतमध्ये दैनिक पुण्यनगरी पेपरचे मालक बाबा बसले आहेत व त्यांनी तुला भेटण्यास बोलावलं आहे असं सांगितलं. हे ऐकून मी दबकतच त्यांच्या दिशेने गेलो. फर्निचरच काम सुरू असल्याने आतमध्ये ते एका खुर्चीवर वृत्तपत्र वाचत होते. मला त्यांनी दुसरी खुर्ची घेऊन बसण्यास सांगितलं. मला आजही आठवतं, त्यांचा पहिला प्रश्न होता तुला काय काम येतं? मी सांगितलं मला डिटीपीचं काम चांगलं येतं व बातमी कशी तयार करायची याचीही माहिती आहे. मला 2 वर्षाचा अनुभव आहे मात्र मी आज अर्ज व बायोडाटा सोबत आणला नाही. त्यावर बाबा म्हणाले तो समोर कॉम्पुटर आहे, तो सुरू कर आणि त्याच्यावर बातम्या टाईप कर अन मला दाखव. पेजमेकरमध्ये पानभरून बातम्या टाईप झाल्यावर मी बाबांना दाखवलं. बाबांनी कौतुकाची थाप पाठीवर टाकली अन म्हणाले छान, अरे रमेश हा पोरगा कामाचा आहे, याची माहिती घे आणि त्याला उद्यापासून कामाला यायला सांग. मी उध्या पगाराच बोलतो…. दुसऱ्या दिवशी मी दिलेल्या वेळेत पोहोचलो, व्यवस्थापक रमेश गायकवाड यांनी माझी संपादक, उपसंपादक यांची ओळख करून दिली व माझे काम सुरू झाले. काही वेळानंतर बाबा आले, त्यांनी मला बोलाऊन विचारलं… आधी किती पगार होता? मी सांगणार इतक्यात थांबलो… बाबा म्हणाले असुदेत, तिथल्यापेक्षा इथं 500 रुपये जास्त देतो, पण काम चांगलं कर… हे ऐकून मीही मान डुलवत होकार दिला. अर्ज अन बायोडाटाशिवाय चांगल्या कामाला, कर्मचाऱ्यांच्या अंगी असलेल्या कलेला महत्व देणाऱ्या बाबांनी माझ्यासारख्या नियतीने दुःखाच्या खाईत लोटलेल्या तरुणाला रोजीरोटी देत भावी आयुष्याचा राजमार्ग दाखवला. बाबांनी दिलेलं ते नोकरीरूपी वरदानच होतं.
वर्ष होतं 2006… दैनिक पुण्यनगरीची कोल्हापूर आवृत्ती 2003 साली सुरू केल्याने मी तेव्हापासून कोल्हापूरमध्ये काम करीत होतो. एकदिवस रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास काम संपवून प्रेसच्या गाडीने गावी पाचवडला येत होतो तेंव्हा कराड शेजारील आटके फाट्यापाशी आमच्या गाडीला भीषण अपघात झाला. गाडीमधील माझ्यासह अन्य तिघे जखमी झाले होतो. या अपघातात मला जरा जास्त लागल्याने माझी स्थिती गंभीर झाली होती व मी सलग दोन दिवस बेशुद्ध राहिलो होतो. अपघातात माझ्या डाव्या डोळ्याला व पायाला गंभीर दुखापत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच बाबा कराडच्या कृष्णा हॉस्पीटलमध्ये आले. माझ्या तब्येतीची चौकशी केल्यावर त्यांना समजलं की माझ्या डाव्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे व कदाचित त्या डोळ्याने भविष्यात मला दिसू ही शकणार नाही. हे कळताच बाबांनी मला पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे ठरवले. त्यावेळचे पुण्यनगरीचे संपादक राजा माने साहेब हे सुद्धा त्यांच्या सोबत होते. पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर बाबांनी डॉक्टरांना सांगितले काही झालं, कितीही पैसे लागले तरी चालतील मात्र माझ्या मुलाला डोळ्याने चांगले दिसले पाहिजे.
एक संपूर्ण दिवस माझ्या डाव्या डोळ्याचे परीक्षण करून डॉक्टरांनी डोळ्याचे ऑपरेशन करण्याचे ठरवले. तिसऱ्या दिवशी ऑपरेशन झाल्यावर डॉक्टरांनी बाबांना ऑपरेशन यशस्वी झाल्याचे सांगितले …. हे ऐकून बाबांना खूप आनंद झाला मात्र त्याचवेळी हॉस्पिटलमध्ये उपस्थित असलेले माझे कुटुंबीय, सहकारी व हॉस्पिटलचे डॉक्टर व कर्मचारी या सर्वांची मने भरून आली, सर्वांच्या डोळ्यांच्या पापण्या अश्रूंनी भरल्या कारण आपल्या एका कर्मचाऱ्यासाठी, त्याला डोळ्याने पुन्हा जग पाहावे यासाठी दैनिक पुण्यनगरीचे मालक, आमच्या सर्वांचे बाबा ऑपरेशन दिवशी दिवसभर माझ्या डोक्याशी बसून होते. बाबांनी मला दुसऱ्यांदा माझ्या डोळ्यांनी जग दाखवलं अन त्यादिवशी फक्त एक मिरची भाजीची प्लेट खाऊन मला पुन्हा उघड्या डोळ्याने जग पाहण्याचं वरदान दिलं.
अरे गायकवाड, या दुनियेत स्वतःचं अस्तित्व निर्माण कर असं सतत सांगणारे बाबा आज आपल्यात नाहीत मात्र माझ्यासारख्या अनेक तरुणांना त्यांनी घडवले, जीवनाला नवी दिशा देत जगण्याची कला शिकवली. अनेकांना आपल्या छत्रछायेत घेवून मोठे केले. एक वृत्तपत्र विक्रेता ते दैनिक पुण्यनगरी, मुंबई चौफेर, वार्ताहर, यशोभूमी व अन्य वृत्तपत्राचे मालक असा त्यांचा वृत्तपत्रसृष्टीतील यशस्वी प्रवास हा थक्क करणारा आहे.
बाबांची शिकवण, संस्कार व आजन्म कष्ट करण्याची दिलेली शिदोरी नेहमीच मला व माझ्यासारख्या अन्य सहकार्यांना पुढील जीवन जगताना प्रेरणादायी ठरणार आहे. बाबांच्या अनेक आठवणींचा खजिना, त्यांचे वरदान दररोज पुण्यनगरी हातामध्ये घेतल्यावर माझ्यासह सर्व कुटुंबियांच्या सदैव स्मरणात राहील…
आदरणीय बाबांना अश्रूपूर्ण भावपूर्ण श्रद्धांजली🙏
महेंद्र गायकवाड (पाचवड, ता.वाई) 9657499959
बाबा, तुम्ही असं कसं सोडून जाऊ शकता?
साल असेल कदाचित १९९७…
६:१२ ची लोकल गेली की, पेपरांची मांडामांड सुरू व्हायची, कस्टमर यायला सुरूवात व्हायची. एका पोराला स्टॉलवर थांबवून पेपर टाकायला जायची वेळ असायची… पहाटे तीनला उठून दादरच्या अवनी ट्रस्ट हॉटेलसमोरून गठ्ठे आणलेले असल्याने डोळे तरवटायचे…
तरीही पेपर वाटायलाच हवेत…
लगबग सुरू असतानाच, एक माणूस समोर उभा राहतो…
“कुठला पेपर देऊ?”
“पेपर नको, नवनाथ सकुंडे तूच का?”
“हो, काय झालं साहेब?”
“पत्ता लिहून घे, हा घे पेन… २५-सी, मारूती माळी चाळ, डी. पी. वाडी, घोडपदेव रोड, मुंबई- ४०००३३”
“लवकर ये, कॉटन ग्रीनला उतरला की, जवळच आहे”
असं म्हणत तो माणूस निघून गेला.
पेपर घेणारे फक्त पैसे टाकायचे, हवा तो पेपर घेऊन निघून जायचे… बोलायचे नाहीत कधीच… पेपर घेणाऱ्यांशिवाय वेगळा माणूस भेटला पहिल्यांदा… मनात चलबिचल चालू होती त्यानंतर काही काळ…
सात-आठ दिवसांनी गेलो…
विचारत-विचारत चाळीतून आत घुसलो… अंगणाबाहेर कपडे, डाळी, कुरवडे वाळत होते… दुमजली घर दिसलं… दबकत आत गेलो…
समोर तोच माणूस दिसला… तुटक्या टेबलवर रिसेप्शन होतं… तिथेच तो माणूस बसलेला…
“अरे, नवा, ये ये… “
“बोला की साहेब”
“तू पेपर विकतो, त्याच पेपरात तुझा लेख असतो, अशा पेपर विक्रेत्याला भेटावं म्हणून बोलवलं, इतर काय कामधंदा करतोस?”
मी काय सांगितलं ते आठवत नाही, पण…
“अरे, स्टेशनवर कोण झोपतं का? नुसता वडापाव खाऊन काही होत नाही, तू इथं येऊन राहा, जेवणाचा डब्बा येईल दोन टायम, असा बेवारसासारखा राहू नको…”
बाबा बोलत असतानाच
कुठूनसा चार कप्प्यांचा स्टिलचा डब्बा येतो…
“चल वर”
वरच्या माडीवर गेलो. त्यांनीच डब्बा उघडला… मी अवघडलो,
‘बसायचं कुठं?’ असा विचार करत आजूबाजूला पाहिलं…
तर तेच मांडी घालून बसलेले दिसले, एक डब्बा दोघांनी खाल्ला… संपूर्ण स्टाफ सोबत होताच. दहा-बारा लोकांच्या घरून आलेले पदार्थ सर्वांनी मिळून खाल्ले.
निघताना तो माणूस एकच बोलला.
“ह्यो पेपर तुझाच आहे, काय लिहिलं तर पोस्टानं नको पाठवू… थेट इथं यायचं, लेखांचा फूलस्केप द्यायचा, समजलं का?”
१९९७ सालानंतर ‘मुंबई चौफेर’, ‘आपला वार्ताहर’ला लिहित राहिलो… वाचकांची पत्र येत राहिली…
बाबांनी नंतर यशोभूमी, कर्नाटक मल्ला, तामिळ टाइम्स, मेट्रो बिट, हिंदमाता सुरू केला.
नवा काळ सांगणाऱ्यांना, जुनं करून टाकलं…
मी लिहित राहिलो…
नंतर ‘पुण्यनगरी’ आला…
दैवदुर्लभाने मी लांब होत गेलो…
‘अग्रलेखांच्या बादशाह’समोर ‘अग्रलेखांचा बिरबल’ उभा राहिला…
बाबा, ‘बादशहा’ ही प्रवृत्ती असते, पण ‘बिरबल ही अवस्था असते’
बिरबल असा सोडून जात नसतो, तो कायम सोबत असतो…
बिरबलाला शोधू वाटलं की, मी असे जीर्ण-जर्जर जुने पेपर पसरत राहणार, घरभर, जगभर…
तुम्ही परत या…
हवं तर, मानखुर्द स्टेशनला मी परत पेपरचा स्टॉल लावतो, तुमच्यासाठी पुन्हा स्टेशनवर झोपतो अन् राहतो, फक्त एकदा स्टॉलसमोर येऊन उभे राहा… प्लीज..!
कारण…
तुमच्याकडे बघून कुणालाच जे खरं वाटत नाही, ते मला जगाला सांगायचंय…
पेपर विक्रेता ते पेपरचा मालक… हा तुमचा प्रवास मी पाहिलाय… दुर्दैवाने लांबून…
‘पुण्यनगरी’ ग्रुपचे मालक तुम्ही आहात, हे मला जगाला ओरडून सांगायचंय…
नवनाथ सकुंडे
पुण्यनगरी चे संस्थापक संपादक मुरलीधर शिंगोटे (बाबा) यांची जीवन कहाणी उलगडणारा प्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांचा खास एपिसोड. (अनेक संकटांना तोंड देत जीवन कसं जगावं हे बाबांकडून शिकावे)
स्वतःला अभिजात मानणा-या अशा एका दैनिकाच्या माजी संपादकांचा किस्सा सांगतात.
त्यांनी म्हणे पानटपरीवर त्यांचा पेपर वाचला जातोय, असे एकदा बघितले. नंतर, त्यांनी आपल्या टीमला हा प्रसंग सांगितला. लोकांना वाटले, साहेब कौतुकाने सांगताहेत. तर ते ओरडून म्हणाले, “याचा अर्थ आपल्या कंटेंटमध्ये काहीतरी दोष आहे. टपरीवाल्याला माझा पेपर वाचावा वाटतो, हेच किती भयंकर लज्जास्पद आहे!”
(पुढे ते संपादक तथाकथित टपरीवरच्या पेपरांचेही संपादक झाले, हा भाग वेगळा!)
मुद्दा असा की, टपरीवाले; रिक्षाचालक; मजूर; कामगार; हमाल, वेटर, मोलकरणी अशा श्रमिकांना केंद्रबिंदू मानणारा पेपर काढणे आणि तो धडाक्यात चालवणे हे मुळातच कमी प्रतिष्ठेचे. पेपरांच्या दुनियेतला ‘वर्गसंघर्ष’ भयंकर. अशावेळी तसा पेपर काढणे, तो वाढवणे आणि तथाकथित मुख्य प्रवाहात त्याला प्रतिष्ठा मिळवून देणे, हे महाकठीण. पेपर विकणा-या एका चौथी पास एजंटाने असे काही करणे तर अशक्यच.
पण, बाबा शिंगोटेंनी हे अशक्य शक्य करून दाखवले.
‘बाबा’ या नावाचा दबदबाच काही और होता!
सामान्य माणसांच्या अंगभूत मुत्सद्दी शहाणपणातून तयार झालेला हा संपादक – मालक होता!
बाबा मला उशिरा भेटले, पण मोजक्या भेटींमध्येही इम्प्रेस करून गेले.
भारतातल्या चार-पाच भाषांत पेपर काढणारा, वाचकांच्या गरजा ओळखून चौफेर प्रयोग करणारा हा शब्दशः अवलिया मालक होता.
व्यक्तिशः त्यांचा प्रवास तर अचंबित करणारा आहेच, पण ‘माध्यम जगताचे लोकशाहीकरण’ म्हणूनही ही उठाठेव कमी महत्त्वाची नाही. कदाचित, आपल्या कामाचे हे मोल खुद्द बाबांनाही कधी समजले नसेल!
उद्या त्यांच्या निधनाच्या बातम्या प्रसिद्ध होतील.
पण, पेपरच्या आठ कॉलमांत ‘बाबा’ मावणार नाहीत!
– संजय आवटे
“चांगलं लिहिलं आहे.खूप भारी.मी वाचत असतो दर रविवारी.आज म्हटलं फोन करूया.”
दैनिक पुण्यनगरीत’गावगोष्टी’कॉलम सुरू होता तेव्हा रविवारी सकाळपासून फोन यायचे.हाही कोणा वाचकाचा फोन असेल असं समजून म्हणालो.
“धन्यवाद. कोण बोलताय आपण.”
“मी मुरलीधर शिंगोटे.”
“बाबा तुम्ही.”मला त्यांना बाबा म्हणतात हे माहिती होतं.पण बाबांचा फोन येईल हे अपेक्षित नव्हतं.पण बाबाच बोलत होते.थोडावेळ कौतुक करत बोलले.मी मला पुण्यनगरीत लिहिलेल्या लिखाणाला प्रतिसाद सांगत होतो. मला अगदी कोकणातील एका छोट्या गावापासून ते मराठवाडा विदर्भातुन फोन यायचे.(काही वाचक मित्र झाले आजही फोन करतात.)लातूर जिल्ह्यातील प्रदिप देशमुख असाच या लिखाणातून भेटलेला दोस्त. माळशिरस तालुक्यातील चांगदेव कांबळे सर यांनी आमच्या पंढरपूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती.त्यांचा संपर्क नव्हता.पण त्यांनी आप्पासाहेब मगर आप्पा यांचा लेख वाचून फोन केला आणि पुन्हा आमचा संपर्क सुरू झाला.अर्थात हे सगळं पुण्यनगरी मूळ..
पुण्यनगरी ने जसे आमच्यासारख्या रांगड्या तरुणांना लिहायची संधी दिली तशी एक वाचकवर्ग तयार केला. या पेपरचा वाचक सर्व वर्गातील आहे.तुम्ही एसटीतुन प्रवास करताना जर एखाद्या स्टँडवर उतरला तर हमखास”पुण्यनगरी”हा बोर्ड दिसायचा. तेव्हा एक गोष्ट नेहमी आठवायची.बाबा आणि त्यांचं शिक्षण..
जुन्नरजवळपास असलेल्या एका खेड्यातला माणूस अनेक ठोकरा खात स्वतःच वर्तमानपत्र सुरू करतो.त्याचा वेलू गगनावरी जातो.वेगवेगळ्या भाषेत वृत्तपत्र निघतात.औपचारिक शिक्षण नसताना बाबांनी वृत्तपत्र सृष्टीत जे योगदान दिले त्याला तोड नाही.
पुण्यनगरी सारख्या पेपरने तर राज्यातील सगळे तालुके कव्हर केले. प्रत्येक तालुक्यात त्यांचा स्ट्रॉंग रिपोर्टर आहेच. हे सगळं बाबांनी उभं केलेले नेटवर्क आहे.मराठी वृत्तपत्राच्या इतिहासात ज्यांच्या नावाची ठळकपणे नोंद होईल असे काम बाबांनी केले आहे.
बाबांच्या जाण्याने वृत्तपत्र क्षेत्रातील एक मार्गदर्शक माणूस आपल्यातून निघून गेला आहे.बोटाला धरून शिकवणारा आणि मनापासून कौतुक करणारा हा माणूस आज आपल्यातून निघून गेला आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली.
-संपत मोरे
बाबांनी रोजी-रोटी अन डोळ्यांचे वरदान देऊन पुन्हा जग दाखवलं…
वर्ष होतं 2002… वाई मधील तांबडी माती सप्ताहिकामध्ये 2 वर्षे काम केल्यावर काही चांगल्या-वाईट अनुभवांची शिदोरी घेऊन वयाच्या 20व्या वर्षी साताऱ्याकडे रोजी-रोटीसाठी वळलो. वयाच्या 20व्या वर्षापर्यंत नियतीने अनेक जिव्हारी लागणारे घाव दिले होते. अशा घायाळ मनाने साताऱ्यातील काही दैनिकांच्या कार्यालयाना कामासाठी भेटी दिल्या. एका दैनिकात डीटीपी विभागात काम मिळालं. तिथं काम करीत असतानाच एका पत्रकार मित्रानं साताऱ्यात नवीन दैनिक पुण्यनगरी सुरू होणार असल्याची माहिती दिली व तिथे कामासाठी भेटण्याचा सल्ला दिला. इथल्यापेक्षा थोडा वाढवून पगार भेटला तर पुढचं ठरवू असं मनाशी ठरवून मी मित्राने सांगीतलेल्या ठिकाणी गेलो. ऑफिसचं काम सुरू होतं. काम सुरू असलेल्या ठिकाणी एका कामगारास भेटण्यासंबंधी विचारल्यावर त्याने मला तेथील व्यवस्थापक रमेश गायकवाड यांच्यापर्यंत पोहोचवले. गायकवाड नाव ऐकल्यावर जीव थोडा हलका झाला. भेटल्यावर त्यांनी मला अर्ज व बायोडाटा मागितला. थोड्याशा गोंधळलेल्या मनस्थितीत त्यांना मी फक्त भेटण्यासाठी व माहिती घेण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी थोडंसं माझ्याकडे दुर्लक्ष करीत कोणत्याही कामासाठी भेटण्याचे असल्यास अर्ज व बायोडाटा घेऊन येण्याबाबत सांगितलं. मी उठून जाणार तेवढ्यात एक भारदस्त आवाज कानावर आला, अरे रमेश कोण आलंय भेटाय… बाबा, एक मुलगा नोकरीसाठी विचारपूस करतोय. बाबांनी सांगितलं, रमेश त्याला आतमध्ये पाठव. हे ऐकल्यावर व्यवस्थापकांनी मला आतमध्ये दैनिक पुण्यनगरी पेपरचे मालक बाबा बसले आहेत व त्यांनी तुला भेटण्यास बोलावलं आहे असं सांगितलं. हे ऐकून मी दबकतच त्यांच्या दिशेने गेलो. फर्निचरच काम सुरू असल्याने आतमध्ये ते एका खुर्चीवर वृत्तपत्र वाचत होते. मला त्यांनी दुसरी खुर्ची घेऊन बसण्यास सांगितलं. मला आजही आठवतं, त्यांचा पहिला प्रश्न होता तुला काय काम येतं? मी सांगितलं मला डिटीपीचं काम चांगलं येतं व बातमी कशी तयार करायची याचीही माहिती आहे. मला 2 वर्षाचा अनुभव आहे मात्र मी आज अर्ज व बायोडाटा सोबत आणला नाही. त्यावर बाबा म्हणाले तो समोर कॉम्पुटर आहे, तो सुरू कर आणि त्याच्यावर बातम्या टाईप कर अन मला दाखव. पेजमेकरमध्ये पानभरून बातम्या टाईप झाल्यावर मी बाबांना दाखवलं. बाबांनी कौतुकाची थाप पाठीवर टाकली अन म्हणाले छान, अरे रमेश हा पोरगा कामाचा आहे, याची माहिती घे आणि त्याला उद्यापासून कामाला यायला सांग. मी उध्या पगाराच बोलतो…. दुसऱ्या दिवशी मी दिलेल्या वेळेत पोहोचलो, व्यवस्थापक रमेश गायकवाड यांनी माझी संपादक, उपसंपादक यांची ओळख करून दिली व माझे काम सुरू झाले. काही वेळानंतर बाबा आले, त्यांनी मला बोलाऊन विचारलं… आधी किती पगार होता? मी सांगणार इतक्यात थांबलो… बाबा म्हणाले असुदेत, तिथल्यापेक्षा इथं 500 रुपये जास्त देतो, पण काम चांगलं कर… हे ऐकून मीही मान डुलवत होकार दिला. अर्ज अन बायोडाटाशिवाय चांगल्या कामाला, कर्मचाऱ्यांच्या अंगी असलेल्या कलेला महत्व देणाऱ्या बाबांनी माझ्यासारख्या नियतीने दुःखाच्या खाईत लोटलेल्या तरुणाला रोजीरोटी देत भावी आयुष्याचा राजमार्ग दाखवला. बाबांनी दिलेलं ते नोकरीरूपी वरदानच होतं.
वर्ष होतं 2006… दैनिक पुण्यनगरीची कोल्हापूर आवृत्ती 2003 साली सुरू केल्याने मी तेव्हापासून कोल्हापूरमध्ये काम करीत होतो. एकदिवस रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास काम संपवून प्रेसच्या गाडीने गावी पाचवडला येत होतो तेंव्हा कराड शेजारील आटके फाट्यापाशी आमच्या गाडीला भीषण अपघात झाला. गाडीमधील माझ्यासह अन्य तिघे जखमी झाले होतो. या अपघातात मला जरा जास्त लागल्याने माझी स्थिती गंभीर झाली होती व मी सलग दोन दिवस बेशुद्ध राहिलो होतो. अपघातात माझ्या डाव्या डोळ्याला व पायाला गंभीर दुखापत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच बाबा कराडच्या कृष्णा हॉस्पीटलमध्ये आले. माझ्या तब्येतीची चौकशी केल्यावर त्यांना समजलं की माझ्या डाव्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे व कदाचित त्या डोळ्याने भविष्यात मला दिसू ही शकणार नाही. हे कळताच बाबांनी मला पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे ठरवले. त्यावेळचे पुण्यनगरीचे संपादक राजा माने साहेब हे सुद्धा त्यांच्या सोबत होते. पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर बाबांनी डॉक्टरांना सांगितले काही झालं, कितीही पैसे लागले तरी चालतील मात्र माझ्या मुलाला डोळ्याने चांगले दिसले पाहिजे.
एक संपूर्ण दिवस माझ्या डाव्या डोळ्याचे परीक्षण करून डॉक्टरांनी डोळ्याचे ऑपरेशन करण्याचे ठरवले. तिसऱ्या दिवशी ऑपरेशन झाल्यावर डॉक्टरांनी बाबांना ऑपरेशन यशस्वी झाल्याचे सांगितले …. हे ऐकून बाबांना खूप आनंद झाला मात्र त्याचवेळी हॉस्पिटलमध्ये उपस्थित असलेले माझे कुटुंबीय, सहकारी व हॉस्पिटलचे डॉक्टर व कर्मचारी या सर्वांची मने भरून आली, सर्वांच्या डोळ्यांच्या पापण्या अश्रूंनी भरल्या कारण आपल्या एका कर्मचाऱ्यासाठी, त्याला डोळ्याने पुन्हा जग पाहावे यासाठी दैनिक पुण्यनगरीचे मालक, आमच्या सर्वांचे बाबा ऑपरेशन दिवशी दिवसभर माझ्या डोक्याशी बसून होते. बाबांनी मला दुसऱ्यांदा माझ्या डोळ्यांनी जग दाखवलं अन त्यादिवशी फक्त एक मिरची भाजीची प्लेट खाऊन मला पुन्हा उघड्या डोळ्याने जग पाहण्याचं वरदान दिलं.
अरे गायकवाड, या दुनियेत स्वतःचं अस्तित्व निर्माण कर असं सतत सांगणारे बाबा आज आपल्यात नाहीत मात्र माझ्यासारख्या अनेक तरुणांना त्यांनी घडवले, जीवनाला नवी दिशा देत जगण्याची कला शिकवली. अनेकांना आपल्या छत्रछायेत घेवून मोठे केले. एक वृत्तपत्र विक्रेता ते दैनिक पुण्यनगरी, मुंबई चौफेर, वार्ताहर, यशोभूमी व अन्य वृत्तपत्राचे मालक असा त्यांचा वृत्तपत्रसृष्टीतील यशस्वी प्रवास हा थक्क करणारा आहे.
बाबांची शिकवण, संस्कार व आजन्म कष्ट करण्याची दिलेली शिदोरी नेहमीच मला व माझ्यासारख्या अन्य सहकार्यांना पुढील जीवन जगताना प्रेरणादायी ठरणार आहे. बाबांच्या अनेक आठवणींचा खजिना, त्यांचे वरदान दररोज पुण्यनगरी हातामध्ये घेतल्यावर माझ्यासह सर्व कुटुंबियांच्या सदैव स्मरणात राहील…
आदरणीय बाबांना अश्रूपूर्ण भावपूर्ण श्रद्धांजली
महेंद्र गायकवाड (पाचवड, ता.वाई) 9657499959
साधेपणातलं अफाट वादळ… !!
एक एक माणसं जिवंतपणीच दंतकथा वाटावेत एवढं अफाट काम उभं करतात… अशाच एका झंझावाताचा आज प्रवास थांबला… त्यांच्या संदर्भात अनेक कथा ऐकुन होतो… पण प्रत्यक्ष भेटून हा माणूस कसा आहे हे पाहायचे होते… सहा एक वर्षापूर्वी राही भिडे या पुण्यात पुण्यनगरीला संपादक म्हणून रुजू झाल्या… त्यांचे स्वागत करायला जायचं म्हणून त्यांना फोन केला… त्यांनी लगेच ये बाबा ( मुरलीधर शिंगोटे ) पण आहेत… तुझी ओळख करून देते म्हणाल्या…. माझं अनेक वर्षाचं स्वप्न साकार होणार होतं म्हणून थोडाही वेळ न गमावता पुण्यातल्या जंगली महाराज रोड वरील पुण्य नगरीच्या कार्यालयात गेलो… बाबांची भेट झाली, भिमेच्या खोऱ्यात जन्मलेल्या जन्मतःचं कष्टाचं लेणं लेवून कल्याण बंदरातून श्रमिकांच्या मुंबईत नशीब अजमावणाऱ्या हजारो लोकांच्या लोंढ्यात मिसळणारा हा माणूस नव्हता.. चौथी पास असलेल्या माणसांनी सुरुवातीला श्रमाची कामं केली… पण मनातल्या जिद्दीनं अन व्यवसायिक चिकाटीनं… राज्यात सर्वाधिक तगडं वृत्तपत्र वितरणाचे जाळे विणून एका यशस्वी वृत्तपत्र समूहाचे मालक होणं… हा प्रवास प्रचंड दिव्य आहे. एका प्रेरणादायी कादंबरीचा विषय आहे. हे त्यांच्या बरोबर घालवलेल्या तासाभराच्या गप्पांनी मला कळालं…. आज तो झंझावात कर्तृत्वाचे डोंगर उभा करून शांत झाला…. हजारो लोकांच्या प्रेरणेचे पाईक असलेल्या मुरलीधर शिंगोटे बाबांना भावपूर्ण आदरांजली…
@युवराज पाटील, जिल्हा माहिती अधिकारी, सातारा