स्थैर्य, सातारा, दि. 18 : सातारा येथील कचरा उचलण्याच्या ठेक्यातील डिपॉझिट म्हणून ठेवलेले 15 लाख रुपये परत मिळवून देण्यासाठी 2 लाख 39 हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणातील चौथा आरोपी सातारा नगरपालिकेतील आरोग्य निरीक्षक राजेंद्र विनायक कायगुडे याला अटक केल्यानंतर न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली.
सातारा नगरपरिषद येथील कचरा उचलण्याच्या ठेक्यातील डिपॉझिट ठेवलेले 15 लाख रुपये परत मिळवून देण्यासाठी सातारा पालिकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संचित धुमाळ याला 2 लाख 30 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याच प्रकरणी पथकाने पालिकेचे आरोग्य निरीक्षक वर्ग 3 गणेश दत्तात्रय टोपे (वय 43) रा. यादोगोपाळ पेठ, सातारा आणि प्रविण एकनाथ यादव (वय 51) रा. एसटी कॉलनीच्या पाठीमागे, गोडोली, ता. सातारा या दोघांना ताब्यात घेतले होते व त्यांनाही अटक केली होती. त्यांना जामीन मंजूर झाला आहे.
या प्रकरणातील आरोग्य निरीक्षक राजेंद्र विनायक कायगुडे (वय 54) रा. एस. टी. कॉलनी पाठीमागे, गोडोली, सातारा हे फरार झाले होता. त्याला तो स्वतःहून हजर झाल्यानंतर अटक करण्यात आली होती. त्याला सातारा येथील न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली.