
स्थैर्य, सातारा, दि.११: कोविड मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वापरले जाणारे लाकूड निकृष्ट दर्जाचे असून, संबंधित वखार चालकाने शासनाची फसवणूक केली आहे. असा आरोप करत वखार चालकाचे जळणाचे बिल प्रशासनाने अदा करू नये, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र वाडेकर यांनी केली आहे.
याबाबत मुख्याधिकारी अभिजित बापट यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, कोविड मृतांवर सातारा पालिकेकडून अंत्यसंस्कार केले जात आहेत. अंत्यसंस्कार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जळणाचा वखार चालक राजेंद्र मारुती कदम यांनी पुरवठा केला आहे. कदम यांनी जळणाचे कोणतेही वजन न करता व वाहतूक भाडे अधिक लावून पालिकेकडे बिलाची मागणी केली आहे. शिवाय अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात आलेले लाकूडही निकृष्ट दर्जाचे आहे.
संबंधित वखार चालकाने शासनाची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप जितेंद्र वाडेकर यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करावी तसेच संबंधित वखार चालकास २०२०-२१ या कालावधीतील जळणाचे बिल प्रशासनाने आता करू नये अशी मागणी वाडेकर यांनी केली आहे.
निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, आयकर विभाग सातारा, आयकर कमिशनर, कोल्हापूर व नगरपालिका प्रशासन अधिकारी यांना देण्यात आली आहे.