
स्थैर्य, फलटण दि. २२ : फलटण व मलठण ला जोडणार्या फलटण शहरातील पाचबत्ती चौकानजिक असलेल्या बाणगंगा नदीवरील पुलाच्या दुरावस्थेकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
फलटण व मलठण ला जोडणार्या या पुलावरुन नेहमीच वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये – जा सुरु असते. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाणगंगा नदीला आलेल्या पूराच्या पाण्याने या पुलाचे दोन्ही बाजूचे संरक्षक कठडे वाहून गेलेले होते. या घटनेला तब्बल 3 महिन्यांचा कालावधी उलटला असून देखील अद्याप पालिकेकडून या पुलाच्या डागडुजीकडे दुर्लक्ष होत असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. शिवाय संरक्षक कठडे नसल्याने या ठिकाणी मोठ्या दुर्घटनेची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे पालिकेने याबाबतचे गांभीर्य लक्षात घेवून पुलाची डागडुजी तातडीने करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.