
स्थैर्य, फलटण, दि. १५ ऑगस्ट : शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील अर्धवट कामांप्रकरणी अमरसिंह खानविलकर यांनी स्वातंत्र्यदिनी उपोषणाला बसल्यानंतर, फलटण नगरपरिषद प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे. पावसामुळे रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे थांबली असून, पावसाळ्यानंतर ती पूर्ण केली जातील, असे लेखी आश्वासन मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी दिले आहे.
अमरसिंह खानविलकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या उपोषणाच्या पत्राच्या अनुषंगाने, मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, पावसाळा संपल्यानंतर संबंधित ठेकेदाराकडून काम पूर्ण करून घेतले जाईल. काम न केल्यास, ठेकेदारावर निविदेतील अटी व शर्तींनुसार कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
या आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर, आपण आपले नियोजित उपोषण स्थगित करावे, अशी विनंती मुख्याधिकारी मोरे यांनी अमरसिंह खानविलकर यांना केली आहे. या पत्राची प्रत जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांनाही माहितीसाठी सादर करण्यात आली आहे.