मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला एमएमआरडीएच्या विविध विकासकामांचा आढावा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.२१: मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव आणि अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ.के. एच. गोविंदराज यांच्यासोबत एमएमआरडीएच्या विविध कामांचा आढावा घेतला. मुंबईत, विशेषत: मुंबई उपनगरात एमएमआरडीएमार्फत विविध कामे सुरू आहेत, याबाबत कामाच्या प्रगतीची ऑनलाईन प्रणालीद्वारे चर्चा करण्यात आली.

पश्चिम आणि पूर्व द्रूतगती मार्गांवर टप्प्याटप्प्याने सौंदर्यीकरण, वाहतूक व्यवस्थापन, पादचारी आणि सायकलींसाठी मार्ग तयार करणे, फ्लायओव्हरच्या खाली अर्बन स्पेसेस तयार करणे अशी कामे केली जात आहेत. याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. पश्चिम द्रूतगती मार्गावर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच्या भागातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी अंडरपासचे काम लवकरच सुरू होईल. कलानगर फ्लायओव्हर येथील उत्तरेकडील मार्गिकेचे काम लवकरच पूर्ण होईल. त्यामुळे कलानगर जंक्शनवरील वाहतूक कोंडी कमी होईल आणि दोन्ही बाजूंची वाहतूक सुरळीत होईल, असे पालकमंत्री श्री.ठाकरे यांनी सांगितले.

मेट्रोच्या कामांच्या प्रगतीबाबतही यावेळी चर्चा झाली. स्टेशनला जोडणाऱ्या मार्गांमध्ये सुधारणा केली जाईल. नरिमन पॉईंट-कफ परेडला जोडणाऱ्या मार्गाबद्दलही यावेळी चर्चा झाली. कोळी बांधवांच्या बोटींना कोणत्याही प्रकारे अडथळा होणार नाही अशाप्रकारे डिझाइन तयार करण्यासाठी कन्सलटंट काम करत आहेत. यावेळी वरळी-शिवडी कनेक्टर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचीही चर्चा झाली. मुंबईतील पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीला आणि कोस्टल रोड ते एमटीएचएलला जोडणारा मार्ग यातून तयार होणार आहे.

एमटीएचएलच्या प्रगतीचाही यावेळी पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी आढावा घेतला. विशेषत: एमटीएचएलच्या दोन्ही बाजूंना झाडे लावणे आणि पालिकेसोबत काही बाबींचे समन्वय यावर चर्चा झाली. कोरोनाच्या जागतिक संकटाच्या काळातही कोरोना प्रतिबंधात्मक काळजी घेत महत्त्वाची कामे व्हायला हवीत. या कामांच्या प्रगतीस आम्ही कटीबद्ध आहोत, असे पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!