स्थैर्य, मुंबई, दि.१०: राज्यभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. दरम्यान राजकीय नेत्यांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी ट्विट करत याविषयी माहिती दिली आहे. तसेच लक्षण नसल्याने त्या होम क्वारंटाइन होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी ट्विटरवरून त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, ‘मी कोविड अँटीजन चाचणी करून घेतली ती सकारात्मक आली. कोणतंही लक्षणं नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतः घरी विलगीकरन होत आहे. माझ्या संपर्कातील सर्व सहकाऱ्यांनी काळजी घ्यावी. माझ्या घरातील सदस्यांची कोविड चाचणी केली. आपल्या शुभेच्छा व आशीर्वादाने लवकरच मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईन,’
दरम्यान राज्यातील कोरोना रुग्णांमध्येही सातत्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रात बुधवारी 23 हजार 577 नवीन रुग्ण आढळले. 13 हजार 906 लोक बरे झाले आहेत. तर 380 रुग्णांनी जीव गमावला आहे. राज्यात आतापर्यंत 9 लाख 67 हजार 349 लोक संक्रमित झाले आहेत. यामध्ये 6 लाख 86 हजार 462 लोक बरे झाले आहेत. 2 लाख 52 हजार 734 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 27 हजार 787 लोकांचा मृत्यू झाला आहे.