केंद्र सरकारमुळे रखडली मुंबई लोकल; अनिल देशमुख यांचा आरोप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, मुंबई, दि १  मुंबईतील सर्वसामान्य लोकांसाठी रेल्वेची उपनगरी लोकल सेवा सुरू करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने केंद्रीय रेल्वे विभागाला रीतसर पत्र पाठवले आहे. तथापि, रेल्वे विभाग ही सेवा सुरू करण्याच्या कामात खोडा घालत आहे, असा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी केला आहे. सामान्य मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी लवकर लोकलसेवा सुरू करावी, यात राजकारण करण्याचे काहीच कारण नाही, असा टोला गृहमंत्री देशमुख यांनी लगावला आहे.

मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेली रेल्वेची लोकल सेवा सर्वसामान्य प्रवाशांना ठराविक वेळा उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून गर्दी टाळता येईल, अशा पद्धतीचे तपशीलवार पत्र केंद्रीय रेल्वे मंत्रालयास देण्यात आले होते. लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू झाली, तर त्यांना दिलासा मिळेल. यात रेल्वेने राजकारण करू नये, असे देशमुख यांचे म्हणणे आहे. यापूर्वीही परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पाठवताना रेल्वे आणि राज्य सरकार यांच्यात वाद झाला होता. आता पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

मुंबईकरांना सरसकट लोकल सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारने पश्चिम आणि मध्य रेल्वेला पत्र पाठविले होते. या पत्राला रेल्वे प्रशासनाकडून उत्तर आले आहे. लोकल सुरू झाल्यावर गर्दीचे नियोजन कसे करणार, अशी विचारणा पत्राद्वारे रेल्वे विभागाने राज्य सरकारला केली आहे. शिवाय लोकल सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकार आणि रेल्वे यांची संयुक्त बैठक लवकर व्हावी. यात गर्दीचे नियोजन करण्याच्या संदर्भात व्यवहार्य मार्ग काढावा, असे पत्रात म्हटले आहे. प्रत्येक तासाला महिला स्पेशल गाडी चालविणे तूर्तास शक्य नसल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!