दैनिक स्थैर्य । दि. ०४ मार्च २०२२ । मुंबई । मुंबईत फॉर्म्युला 1 (F 1 H 2 O) पॉवर बोट वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022 या स्पर्धेचे डिसेंबर 2022 मध्ये आयोजन करण्यात येणार असून, ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिली.
जागतिक स्तरावरील पॉवर बोट वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेविषयी मंत्रालयात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस ब्रिगेडीयर श्री. सावंत, कर्नल राज पाल, क्रीडा विभागाच्या उपसचिव श्रीमती नानल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. केदार म्हणाले, जागतिक स्तरावरील या स्पर्धेकरीता नौदलाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार आहे. जागतिक स्तरावरील प्रथमच अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धकांसह आयोजकांचे प्रशिक्षण कार्यक्रम ही आयोजित करण्यात येणार आहेत. पॉवर बोट स्पर्धा राज्यात प्रथमच होत असल्याने क्रीडा प्रेमींना माहिती होण्याकरीता याची व्यापक प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
पॉवर बोट ही स्पर्धा अतिशय चित्तथरारक मानली जाते. क्रीडा प्रेमींना आकर्षक वाटणारी ही स्पर्धा असेल. जागतिक स्तरावरील स्पर्धा असल्याने त्याच क्षमतेने आयोजन करण्यासाठी विविध समित्या स्थापन करुन ही स्पर्धा डिसेंबर 2022 ला आयोजित करण्यात येणार असून स्पर्धेसाठीची तयारी जून 2022 पासून करण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. केदार यांनी सांगितले. कर्नल राज पाल यांनी या स्पर्धेविषयी सविस्तर माहितीचे सादरीकरण केले. ब्रिगेडीयर सावंत यांनी पॉवर बोट स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व स्तरावर सहकार्य करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.