स्थैर्य, दि.२१: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे हे तिघे अडचणीत येण्याची शक्यता आहे. या तिघांविरुद्ध निवडणूक प्रतिज्ञापत्रात चुकीची किंवा अर्धवट माहिती दिल्याचा आरोप करण्यात आल्याची माहिती आहे. याबाबत निवडणूक आयोगाने सीबीडीटीकडे तपास पाठवला असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगितले जात आहे.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, निवडणूक आयोगाने सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची निवडणूक प्रतिज्ञापत्रांची पडताळणी करण्याची विनंती केली आहे.
आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे या तिघांनी प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार एका माहिती अधिकार (RTI) कार्यकर्त्याने निवडणूक आयोगाकडे केली असल्याची माहिती आहे. यापार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून हे पाऊल उचलण्यात आले असल्याच्या चर्चा आहेत.
राज्यात सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आहे. शिवेसना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या सरकारमधील नेत्यांनी सादर केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात अनेक विसंगती असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यात संपत्ती आणि कर्ज याबद्दल चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्याने या तिघांचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.