दैनिक स्थैर्य | दि. ३० ऑगस्ट २०२३ | फलटण | श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे अध्यक्ष कै. सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) यांचे सोमवार, दि. २१ ऑगस्ट २०२३ रोजी पुणे येथे उपचारादरम्यान देहावसान झाले.
कै. सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) काका बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. कै. सुभाषकाकांनी फलटण तालुक्यातील गोरगरीब, दीनदुबळ्या, शेतकरी व शेतमजूर कामगारांच्या तसेच बहुजन समाजातील मुलांची शिक्षणातील होणारी परवड दूर करण्यासाठी आधुनिक काळातील शिक्षणाची गरज ओळखून श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या सर्व महाविद्यालयांत विविध अभ्यासक्रमांची सुरूवात केली. याचे फलित म्हणजेच विविध क्षेत्रांमध्ये आज उच्च पदावर कार्यरत असणारे या संकुलाचे माजी विद्यार्थी होत.
कै. सुभाषकाकांचे आचार व विचार हे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, थोर साहित्यिक व विचारवंत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब व स्वर्गीय वेणूताई चव्हाण यांच्या मुशीतून परिपक्व असे घडले होते. ते नेहमी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना सांगायचे की, दुसर्यांच्या चुकांकडे पाहू नका, नाहीतर आपली दृष्टी दोषपूर्ण होईल. श्रीराम एज्युकेशन संकुलातील विद्यार्थी हा सुसंस्कृत घडावा म्हणून ते सतत प्रयत्नशील होते.
कै. सुभाषकाकांना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांसारखे राजकारणातील भक्कम पाठबळ असतानासुद्धा त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांचा कधीही फायदा करून घेतला नाही; परंतु समाजाच्या कल्याणासाठी सतत कार्यरत राहून गोरगरीब जनतेचे त्यांनी कल्याण करून दिले.
राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रात कार्य करणार्या लोकांना येणार्या अडचणी सोडविण्यासाठी एक हक्काची व्यक्ती म्हणून काकांकडे पाहिले जायचे व काकाही तेवढ्याच तत्परतेने व प्रामाणिकपणे प्रत्येकाला त्यांच्या समस्येतून बाहेर काढायचे. म्हणून फलटण तालुक्यातील सर्व क्षेत्रातील प्रत्येक लोकांकरीता ते एका दीपस्तंभासारखे होते. असे स्वच्छ मनाचे, मनमिळावू, प्रसन्न व हसतमुख, कर्तव्यदक्ष, सर्वांना हव्याहव्याशा व आपल्याशा वाटणार्या व्यक्तीच्या जाण्याने फलटणमधील सर्वच क्षेत्रात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
कै. सुभाषकाकांसारख्या त्यागी, परिपूर्ण बहुआयामी व्यक्तिमत्वास श्रीराम संकुल व फलटणकरांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली!