स्थैर्य, मुंबई, दि. १०: मुल्ला, मुलाणी बोकड व्यवसाय करणाऱ्या समाजाला धान्य अर्थातच बलुता द्या अशी मागणी महाराष्ट्र राज्य मुल्ला मुलाणी समाजाचे संस्थापकीय अध्यक्ष शाहरुख मुलाणी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदन ई-मेलद्वारे पाठवून केले आहे.
यावेळी मुलाणी म्हणाले की, भारतीय मुसलमान अल्पसंख्याक मधील मुल्ला, मुलाणी हा एक भटका समाज आहे. गावोगावे फिरून देवी देवतांच्या जत्रेत तसेच दर्ग्याचे उरूस आदींमध्ये बोकड कापून बलुतेदारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो. पण, गेल्या वर्षभरापासून कोरोना कोविड – 19 विषाणू च्या संसर्गजन्य मुळे लॉकडाऊन असल्याने सर्व जत्रा, उरूस हे बंद पडले आहे. त्यामुळे मुल्ला मुलाणी समाजाचे उदरनिर्वाह होणे कठीण झाले आहे. ज्या ठिकाणी जत्रा, उरूस सुरू आहेत त्या ठिकाणी पूर्वी 100 बोकड कापले जायचे परंतु, आज त्याच ठिकाणी 5 बोकड कापले जात आहे. लोकांच्या उत्पन्नात घट झाल्याने आज कोणीच बोकड कापत नाही. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सुद्धा बंद असल्याने जनावरांची खरेदी विक्री सुद्धा बंद आहे. ज्याअर्थी शहरात ज्या मुल्ला, मुलाणी समाजाचे मटण व्यवसाय करतात. त्यांना सोमवार ते शनिवार पर्यंत अल्प उत्पन्न होते तर फक्त रविवारीच सदरहू व्यवसाय नफ्याचे उत्पन्न मिळते. हा नफा एका बोकडा मागे फक्त 100 ते 200 रुपयांचा होत असतो.
ज्याअर्थी कोरोना रुग्णांना अशक्तपणा येतो असे समजते. त्यांना प्रथिनेयुक्त अन्न खाणे आवश्यक आहे. असे तज्ञ डॉक्टरांचे मत आहे. 100 ग्राम मटण मध्ये 234 कॅलरी असते. त्या अनुषंगाने मटण व्यावसायिकांची दुकाने सुरू ठेवायचे आदेश द्यावेत. एक व्यक्तीला वैज्ञानिक दृष्ट्या मासिक 15 ते 20 किलो धान्य लागते. मुल्ला, मुलाणी समाज भटका असल्याने व अशिक्षित असल्याने अनेकांचे शिधापत्रिका नाहीत. त्यामुळे त्यांना रेशन मिळणे अवघड आहे. त्या अनुषंगाने ग्रामीण भागात ग्रामसेवक व शहरी भागात प्रभाग अधिकारी यांनी शिफारस केलेल्या मुल्ला, मुलाणी परिवारास बीपीएल धारकानुसार अल्प दरातच धान्य देण्याचे संबंधित विभागास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश द्यावेत तसेच इतर बारा बलुतेदार समाजाचा सुद्धा विचार व्हावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य मुल्ला मुलाणी समाजाचे अध्यक्ष शाहरुख मुलाणी यांनी केली आहे.
तसेच सदरहू मागणी अल्पसंख्याक विकास, मदत व पुनर्वसन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री, राज्यमंत्री, संबंधित विभागाचे प्रधान सचिव तसेच राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देखील ई-मेलद्वारे निवेदन देण्यात आले असल्याचे मुलाणी माहिती दिली.