मुकुल माधव फाउंडेशनतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य शिबिर 

भुईंज येथील 241 ज्येष्ठ नागरिक रुग्णांची विशेष तपासणी


भुईंज- आरोग्य शिबिरात रुग्णांची तपासणी करताना डॉक्टर. (छाया – अतुल देशपांडे, सातारा)

स्थैर्य, 22 फेब्रुवारी, सातारा : फिनोलेक्स इंडस्ट्रीज यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत, मुकुल माधव फाउंडेशन आणि सातारा जिल्हा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र, भुईंज (ता. वाई, जि. सातारा) येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.गेल्या 11-12 वर्षांपासून मुकुल माधव फाउंडेशन सातारा जिल्ह्यात व्यवस्थापकीय संचालिका रितू छाब्रिया यांच्या मार्गदर्शनाखाली सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांसाठी सहा ठिकाणी पुनर्वसन केंद्रे उभारून कार्यरत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठीही फाउंडेशन सातत्याने कार्य करत असून, भुईंज येथील हे शिबिर त्या उपक्रमाचाच एक भाग होता.

या शिबिरामध्ये एकूण 241 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 167 वयोवृद्ध नागरिक आणि 36 ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला. तसेच 38 आशा स्वयंसेविकांचीही आरोग्य तपासणी करण्यात आली. दंतचिकित्सा, अस्थिरोग, फिजिओथेरपी, नेत्ररोग व सर्वसाधारण तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली.तपासणीदरम्यान ज्यांना मोतीबिंदू आढळला आहे, त्यांचे मोफत ऑपरेशन मुकुल माधव फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

या शिबिरासाठी पुणे येथील नवले हॉस्पिटल, संचेती हॉस्पिटल ,आणि ह,वी, सरदेसाई हॉस्पिटल येथील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते.शिबिरास वाई पंचायत समिती सदस्या व सातारा जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा डॉ.सुरभी भोसले यांनी भेट दिली.तसेच भुईंज गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
डॉ. सुरभी भोसले म्हणाल्या, फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशन राबवत असलेला हा आरोग्य शिबिराचा उपक्रम अत्यंत उल्लेखनीय आणि समाजोपयोगी आहे. या भागातील प्रतिनिधी म्हणून मी त्यांच्या कार्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करते.शिबिर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी फिनोलेक्स व मुकुल माधव फाउंडेशनचे प्रतिनिधी संतोष शेलार, योगेश रोकडे, सौ.यास्मिन शेख तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र भुईंज येथील अधिकारी, कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका यांनी विशेष परिश्रम घेतले.


Back to top button
Don`t copy text!