
स्थैर्य, सातारा, दि. 28 सप्टेंबर : व्हीलचेअर्स वाटप करण्याच्या छोट्या कार्यक्रमाने सुरु झालेल्या उपक्रमांतून हजारोंच्या आयुष्यात बदल घडवण्याचे काम झाले. फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन यांच्या सीएसआर अंतर्गत उपक्रमांतील सर्वात प्रभावी आणि महत्वाचा असा ’मिशन सेरेब्रल पाल्सी’ उपक्रम दहा वर्षे पूर्ण करीत आहे. सातारा, रत्नागिरी, गोवा (पर्वोरिम) आणि गुजरात (मसार) येथे 1000 पेक्षा अधिक मुलांचे व त्यांच्या कुटुंबाचे जगणे बदलले आहे. मुकुल माधव फाउंडेशन’ च्या वतीने जिल्ह्यातील सेरेब्रल पाल्सीग्रस्त शेकडो मुलांना मदतीचा हात दिला आहे.
या उपक्रमाची सुरुवात 2015 मध्ये झाली. सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने सेरेब्रल पाल्सीग्रस्त 313 मुलांना व्हीलचेअर्स व कमोड चेअर्स देण्यासाठी फाउंडेशनकडे विनंती केली. प्रत्यक्ष पडताळणीत सातार्यात 507 मुले आढळली. त्यानंतर वर्षभरात फिनोलेक्स व मुकुल माधव फाउंडेशनने चीनहून आयात केलेल्या 178 विशेष व्हीलचेअर्स (प्रत्येकी किंमत सुमारे 15,500 रुपये) व 104 कमोड चेअर्स मुलांना वाटप केल्या. परंतु यावेळी घराघरांत दिलेल्या भेटीदरम्यान लक्षात आले की मुलांना आवश्यक थेरपी मिळत नाही. यामुळे केवळ उपकरण नव्हे, तर सातत्यपूर्ण वैद्यकीय सेवा, थेरपी व समुदायाचा आधार आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आणि ’मिशन सेरेब्रल पाल्सी’चा प्रवास सुरू झाला.
मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांच्या मार्गदर्शनखाली सुरु झालेला हा उपक्रम गेल्या दहा वर्षात अधिक व्यापक झाला आहे. संचेती हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल व केईएम हॉस्पिटलच्या सहकार्यातून 25 हून अधिक मूल्यमापन शिबिरे आयोजित केली आहेत. पहिल्या शिबिरात 507 मुलांची ओळख पटली. सातारा, रत्नागिरी आणि इतर काही ठिकाणी ही शिबिरे झाली. त्यातून हजारो मुलांच्या आजाराचे निदान झाले आणि त्यांना पुनर्वसनासाठी सेवा देण्यास सुरुवात केली. आजघडीला सातार्यात सहा, रत्नागिरीत एक, गुजरातमध्ये एक आणि गोव्यात एक अशी एकूण 9 पुनर्वसन केंद्रे कार्यरत आहेत. येथे फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, समुपदेशन, शस्त्रक्रियांसाठी साहाय्य व वैद्यकीय मदत पुरवली जाते.
यासह क्षमता विकास प्रकल्पांतर्गत 1,300 पेक्षा अधिक आशा व एएनएम कार्यकर्त्यांना गर्भावस्था काळजी, लवकर निदानाबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच 250 शाळाशिक्षक व 50 डॉक्टरांसाठी कार्यशाळा घेतली गेली आहे. कोविड काळात ऑनलाइन थेरपी, टेलीकन्सल्टेशन, तसेच आर.के. टेलिव्हिजनवरून दैनंदिन व्यायाम व योग प्रक्षेपण सुरु होते. 75 शस्त्रक्रिया, 198 उपकरणांचे वाटप; तरुणांना रोजगारासाठी शिलाई मशीन, दुकान, मेणबत्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
अनेक मुलांनी शस्त्रक्रियेनंतर चालण्यास सुरुवात केली, पालकांना घरीच थेरपी देणे शक्य झाले. काही तरुणींना रोजगार उपलब्ध होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढला, ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. या कार्याचा उचित गौरव झाला असून, 2016 मध्ये या उपक्रमाला ’बीटी-सीएसआर एक्सलन्स अवॉर्ड’ तसेच सातारा जिल्हा परिषदेकडून सन्मान पत्र मिळाले आहे, याचा आनंद असून, यापुढे आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारे आहे, असे रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या.मिशन सेरेब्रल पाल्सी हा केवळ आरोग्य प्रकल्प नाही, तर करुणा आणि सक्षमीकरणाची चळवळ आहे. समाजाच्या चांगल्या आरोग्यासाठी फाउंडेशन सदोदित कार्यरत राहील, असे मुकुल माधव फाऊंडेशनच्या विश्वस्त रितु प्रकाश छाब्रिया यांनी सांगितले.
दशकपूर्ती उत्सव साजरा करण्यासाठी सातारा जिल्ह्यामध्ये 25 सप्टेंबर रोजी सातारा येथे ,26 सप्टेंबर रोजी वडूज येथे आणि 27 सप्टेंबर रोजी वाई येथे आरोग्य शिबिरांच्या आयोजन करण्यात आले. यामध्ये एकंदरीत मिळून 397 विकलांग मुलांनी लाभ घेतला. या कॅम्प करिता जिल्हा न्यायाधीश श्रीमती बेंदवडकर मॅडम, निवासी जिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेश खलीपे , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कर्पे , जिल्हा शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी , जिल्ह्यातील समग्र शिक्षा अभियानाचे जिल्हा प्रमुख ज्ञानदेव शेलार तसेच जिल्ह्यातील विशेष शिक्षक, फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे सचिन कुलकर्णी ,अनिल वहाबी, परेश करण,फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे वितरक, प्रतिनिधी अभिषेक चौगुले, मुकुल माधव फाउंडेशन चे बबलू मोकळे,यास्मिन शेख आणि संतोष शेलार यांनी हे कॅम्प यशस्वी व्हावे याकरता विशेष मेहनत घेतली. याचा अभियानाचा एक भाग म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात 10 ते 12 ऑक्टोबर 2025 दरम्यान शिबिरांच्या आयोजन केलेले आहे.