मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा राजाळे येथून शुभारंभ; आमदार सचिन पाटील यांनी विकासासाठी दत्तक घेतले गाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त उपक्रम; गावे समृद्ध करण्याचा निर्धार


स्थैर्य, राजाळे, दि. २० सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त, मौजे राजाळे येथे “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” आणि “महसुली पंधरवडा” या तालुकास्तरीय उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. हा कार्यक्रम आमदार श्री. सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

या कार्यक्रमास प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर, तहसीलदार श्री. अभिजीत जाधव, जिल्हा परिषद मुख्य लेखा-वित्त अधिकारी श्री. राहुल कदम, गटविकास अधिकारी श्री. सतीश कुंभार, भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री. जयकुमार शिंदे, माजी सनदी अधिकारी श्री. विश्वासराव भोसले, सरपंच सौ. कविता महिपाल यांच्यासह अनेक अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर यांनी ‘महसुली पंधरवड्या’अंतर्गत पानंदीचे रस्ते, ७/१२ मधील अडचणी, विविध दाखले आणि भूमीहिनांना जमिनी देण्यासंबंधित कामांसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले. जिल्हा संपर्क अधिकारी श्री. कदम यांनी पंचायतराज अभियानाच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार श्री. सचिन पाटील यांनी सांगितले की, गावे समृद्ध झाल्याशिवाय देश समृद्ध होणार नाही, याच संकल्पनेतून हे अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांना २४८ कोटी रुपयांची १९०० बक्षिसे दिली जाणार आहेत. यावेळी त्यांनी राजाळे गावाच्या विकासाची जबाबदारी घेत, हे गाव दत्तक घेत असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. राष्ट्रपती पदक विजेत्या या गावाला राज्यस्तरावरही नक्की पुरस्कार मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या अभियानातून ‘लखपती दीदी’ घडवणे, ‘एक व्यक्ती, एक झाड’ उपक्रम, सौर ऊर्जा, घनकचरा व्यवस्थापन, ऑनलाइन सुविधा यांसारख्या अनेक बाबींवर भर दिला जाणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. राजाळे गावाने यापूर्वीही अनेक दिशादर्शक कामे केली असून, सर्वांनी मिळून हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सोसायटीचे चेअरमन श्री. नीलकंठ धुमाळ यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!