
स्थैर्य, राजाळे, दि. १७ सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त राज्य शासनाच्या निर्देशानुसार, फलटण तालुक्यात “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” आणि “महसुली सेवा पंधरवडा” या उपक्रमांचा शुभारंभ मौजे राजाळे येथे उत्साहात करण्यात आला. आमदार श्री. सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर, तहसीलदार श्री. अभिजीत जाधव, पंचायतराज अभियानाचे संपर्क सचिव तथा जिल्हा परिषद मुख्य लेखा-वित्त अधिकारी श्री. राहुल कदम, लेखा अधिकारी समाधान चव्हाण, तालुका कृषी अधिकारी श्री. गायकवाड, गटविकास अधिकारी श्री. सतीश कुंभार, नायब तहसीलदार (मुख्यालय) श्री. सोनवणे, नायब तहसीलदार सौ. देवकाते, नायब तहसीलदार श्री. तुषार गुंजवटे, मंडळ कृषी अधिकारी स्वप्निल बनकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री. जयकुमार शिंदे, युवा नेते संदीप चोरमले, माजी सनदी अधिकारी श्री. विश्वासराव भोसले उपस्थित होते.
यासोबतच सरपंच सौ. कविता महिपाल, माजी सरपंच सौ. सविता शेडगे, सौ. स्वाती दोंदे, सौ. पद्मावती शेडगे, माजी सरपंच श्री. मोहनराव सुतार, उपसरपंच श्री. प्रेमचंद भोईटे, सोसायटी चेअरमन श्री. नीलकंठ धुमाळ, माजी चेअरमन मारुती जाधव, श्री. संपतराव जाधव, श्री. गणपतराव लक्ष्मण निंबाळकर, व्हाईस चेअरमन बापुराव देशमुख, पोलीस पाटील महेश शेडगे, उमेद सीआरपी सौ. अश्विनी शेडगे, केंद्र शाळा प्रमुख सौ. छाया भोसले, मंडळ अधिकारी श्री. कैलास जाधव, डॉक्टर पारवे पाटील यांच्यासह सर्व सोसायटी व ग्रामपंचायत सदस्य, बचत गटांच्या महिला पदाधिकारी, महसूल अधिकारी, आशा/अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत अधिकारी श्री. आनंदराव गुरव, ग्रामपंचायत कर्मचारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि ज्योत प्रज्वलित करून करण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर यांनी ‘महसुली सेवा पंधरवडा’ अंतर्गत ७/१२ मधील अडचणी, पानंद रस्ते, रेशनिंग, विविध दाखले आणि भूमीहीन बेघर लाभार्थ्यांना जमिनी देण्यासंबंधित कामांसाठी ग्रामस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन केले. यानंतर जिल्हा संपर्क अधिकारी श्री. राहुल कदम यांनी समृद्ध पंचायतराज अभियानाची अंमलबजावणी कशी करावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
आमदार श्री. सचिन पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, गावे समृद्ध झाल्याशिवाय देश समृद्ध होणार नाही, हीच भूमिका घेऊन राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ग्रामविकासमंत्री श्री. जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांना एकूण २४८ कोटी रुपयांची १९०० बक्षिसे दिली जाणार आहेत. यावेळी त्यांनी राजाळे गाव समृद्ध पंचायत अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी दत्तक घेत असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली.
आमदार पाटील पुढे म्हणाले की, अभियानातून शाश्वत विकास, आरोग्य, शिक्षण, उपजीविका आणि सामाजिक न्यायावर भर दिला जाईल. बचत गटांच्या माध्यमातून ‘लखपती दीदी’ घडवणे आणि ‘एक व्यक्ती, एक झाड’ यासारखे उपक्रम राबवून गाव हरित व स्वच्छ करायचे आहे. सौरऊर्जा, घनकचरा व्यवस्थापन, सूक्ष्म सिंचन, ऑनलाइन सुविधा, मनरेगा अंतर्गत विविध कामे प्रभावीपणे राबवून गावाचा चेहरामोहरा बदलायचा आहे.
राजाळे हे राष्ट्रपती पदक विजेते गाव असून, या गावाने यापूर्वीही स्मार्ट शाळा, व्यायामशाळा, गटशेती यांसारख्या उपक्रमांतून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. हाच वारसा पुढे नेत, सर्वांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून खांद्याला खांदा लावून गावाच्या विकासासाठी सहकार्य करावे. या अभियानात लोकप्रतिनिधी म्हणून जिथे गरज भासेल, तिथे मी खंबीरपणे उभा राहीन, अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमाचे निवेदन आणि आभार सोसायटीचे चेअरमन श्री. नीलकंठ धुमाळ यांनी मानले.