नेहरू हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूलचा डंका; तीन गटांमध्ये पटकावले जिल्हास्तरीय विजेतेपद


स्थैर्य, फलटण, दि. ५ सप्टेंबर : फलटण येथील श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुलात नुकत्याच पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय नेहरू कप हॉकी स्पर्धेत, मुधोजी हायस्कूलच्या संघांनी आपली विजयी परंपरा कायम ठेवत तीन गटांमध्ये विजेतेपद पटकावले आहे. १७ वर्षांखालील मुलींच्या अंतिम सामन्यात मुधोजी हायस्कूलने साताऱ्याच्या सैनिक स्कूल संघावर मात करून प्रथम क्रमांक मिळवला. यासोबतच, १५ वर्षांखालील मुले आणि १७ वर्षांखालील मुलांच्या गटातही मुधोजी हायस्कूलने जिल्हास्तरीय विजेतेपद पटकावले आहे.

या घवघवीत यशामुळे, मुधोजी हायस्कूलच्या तिन्ही संघांची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शाळेच्या या यशामागे प्रशिक्षकांची वर्षभराची मेहनत आणि खेळाडूंचा नियमित सराव आहे. राष्ट्रीय प्रशिक्षक श्री. महेश खुटाळे, राष्ट्रीय प्रशिक्षक श्री. सचिन धुमाळ आणि क्रीडा शिक्षक श्री. खुरंगे यांनी खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच, खेळाडू विनय नेरकर, ऋषिकेश पवार आणि कपिल मोरे हे देखील विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन करत असतात.

गेली अनेक वर्षे शालेय हॉकी स्पर्धांमध्ये राज्य पातळीवर मुधोजी हायस्कूलचा दबदबा राहिला आहे. जिल्हास्तरीय विजय ही यशाची पहिली पायरी असून, राज्य स्तरावर विजेतेपद मिळवणे हेच मुख्य उद्दिष्ट असल्याचे प्रशिक्षकांनी सांगितले. या मैदानातून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडले असून, देशासाठी उत्तम खेळाडू तयार करण्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. या विजयामुळे शाळेच्या आणि शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.


Back to top button
Don`t copy text!