मुधोजी हायस्कूलच्या महिला हॉकी संघाने रचला इतिहास; राज्यस्तरीय नेहरू चषकावर कोरले नाव

अंतिम सामन्यात बलाढ्य क्रीडा प्रबोधिनी, नाशिकवर मात; दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र


स्थैर्य, फलटण, दि. ०१ ऑक्टोबर : फलटणच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या १७ वर्षांखालील मुलींच्या हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरी करत राज्यस्तरीय जवाहरलाल नेहरू चषक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्यांनी बलाढ्य क्रीडा प्रबोधिनी, नाशिक संघाचा पराभव करत, दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला आहे. फलटणच्या इतिहासात १७ वर्षांखालील महिला संघाने राष्ट्रीय पातळीवर झेप घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत महाराष्ट्रातील नऊ विभागांचे संघ सहभागी झाले होते. कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुधोजी हायस्कूलच्या संघाने सुरुवातीपासूनच नेत्रदीपक कामगिरी केली. त्यांनी पहिला सामना मुंबई विभागाविरुद्ध ४-०, तर उपांत्य सामना अमरावती विभागाविरुद्ध ७-० अशा एकतर्फी फरकाने जिंकला.

अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला. बलाढ्य क्रीडा प्रबोधिनी, नाशिक संघाविरुद्ध तिसऱ्या सत्रात अनुष्का केंजळे हिने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर चौथ्या सत्रात वेदिका वाघमोरेने उत्कृष्ट मैदानी गोल करत संघाचा विजय निश्चित केला. विशेष म्हणजे, अंतिम सामन्यात विरोधी संघाला एकही गोल करू न देण्याचा विक्रमही या संघाने प्रस्थापित केला.

या विजयात वेदिका वाघमोरे, सिद्धी केंजळे, निकिता वेताळ, अनुष्का केंजळे, श्रुतिका घाडगे, श्रद्धा यादव यांच्यासह संपूर्ण संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन केले. या संघाला ज्येष्ठ हॉकी मार्गदर्शक महेश खुटाळे, सचिन धुमाळ आणि क्रीडा शिक्षक बी. बी. खुरंगे यांचे मार्गदर्शन लाभले.

या ऐतिहासिक यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दिपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासन अधिकारी अरविंद निकम आणि प्राचार्य वसंतराव शेडगे यांनी संपूर्ण संघाचे आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!