दैनिक स्थैर्य । दि.१७ नोव्हेंबर २०२१ । फलटण । संस्थानकाळामध्ये फलटणसारख्या ग्रामीण भागामध्ये शिक्षण सुरु करण्यासाठी श्रीमंत मुधोजीराजेंनी फलटणमध्ये मुधोजी हायस्कुलची स्थापना केलेली होती. मुधोजी हायस्कुलची स्थापना नक्की कोणत्या दिवशी झाली, हे अचूकपणे कोणालाही सांगता येणार नाही. श्रीमंत मुधोजीराजेंच्या काळामध्ये तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर हे फलटणला आलेले होते. त्यावेळी त्यांनी सदरील विद्यालयाचे नामकरण मुधोजी हायस्कुल असे केले. त्यापूर्वी पासूनच मुधोजी हायस्कुल हे सुरु झालेले होते. मुधोजी हायस्कुलच्या माध्यमातून फलटणमधील सर्वांनाच उत्कृष्ट शिक्षण देण्यासाठी आम्ही सर्वजण आजसुद्धा कार्यरत आहोत, अशी ग्वाही फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव व जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिली.
मुधोजी हायस्कुल व जुनिअर कॉलेजचे वय वर्षे १०१ असणारे विद्यार्थी गजानन गोडबोले यांचा यथोचित सत्कार आयोजित केलेला होता. त्यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कॉन्सिल सदस्य लायन भोजराज नाईक निंबाळकर, डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, प्रशासकीय अधिकारी अरविंद निकम, मुधोजी हायस्कुलचे प्राचार्य बाबासाहेब गंगावणे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
मुधोजी हायस्कूल मध्ये गजानन गोडबोले यांचा होत असलेला हा सत्कार हा सत्कार म्हणणे योग्य ठरणार नाही. प्रशालेच्या इतिहासात १०१ वर्षे पुर्ण झालेले विद्यार्थी आलेले आहेत. पुन्हा अशी वेळ येईल असे मला तरी वाटत नाही. १९३८ साली गोडबोले हे पास झाले व भावी आयुष्यासाठी मार्गस्थ झाले. गोडबोले यांची स्मरणशक्ती आजही बलवत्तर आहे. ज्या शिक्षकांची नावे त्यांनी घेतली, त्या शिक्षकांची नावे आपल्याला सुध्दा माहित नसतील. गोडबोले यांचे फोनवरून बोलताना सुध्दा स्पष्ट बोलणे व जास्त ऐकण्याचा सुध्दा प्रोब्लेम गोडबोले यांना नाही. गोडबोले यांच्या प्रमाणे संस्थेमध्ये पुन्हा कोणाला असा योग्य येईल, हे सांगता येणार नाही. मुधोजी हायस्कुलच्या इतिहासातील हा क्षण सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवणे गरजेचे आहे, असेही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आमच्या कुटुंबीयांची व प्रशालेची भेटीची व्यवस्था ही अतिशय उत्तम केलेली आहे. मुधोजी हायस्कूलमध्ये उत्कृष्ट शिक्षण मिळाल्यानेच आयुष्यातील माझा पाया भक्कम झाला. त्यावेळी मुधोजी हायस्कुल मध्ये विविध स्पर्धांसह इतर स्पर्धांचे आयोजन वारंवार केले जात होते. इतर स्पर्धांबरोबरच मैदानी खेळातील विविध खेळांचे प्रशिक्षण सुद्धा त्यावेळी पासूनच मुधोजी हायस्कुलच्या माध्यमातून दिले जात आहे. वर्षातुन एकदा किंवा दोन वेळा सहलीचे सुद्धा नियोजन आमच्या काळामध्ये मुधोजी हायस्कुलमधील शिक्षक मंडळी करीत असत. मी शिक्षण घेत असताना दोन वेळा प्लेगची साथ आलेली होती. त्या वेळी श्रीमंत मालोजीराजेंनी फलटण शहराच्या बाहेर झोपड्या बांधुन सर्व फलटणकरांची व्यवस्था केलेली होती. त्यामुळेच प्लेगची साथ फलटणमध्ये आटोक्यात आलेली होती. प्लेगच्या काळामध्ये फलटण शहरापासून बाहेर राहिल्याने पोहणे व शेतात खेळायला मिळाले, असे गजानन गोडबोले यांनी स्पष्ट केले.
आम्ही मुधोजी हायस्कुलमध्ये शिक्षण घेत असताना बहुतांश शिक्षकांना सुध्दा इंग्रजी येत नसत. परंतू गणित व अचूक शुध्दलेखनासह मराठी हे मुधोजी हायस्कूलमध्ये उत्कृष्ट शिकवले जात होते. मुधोजी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया भक्कम करण्याचे काम करत आहे. मी शिक्षण घेत असताना शिक्षकांनी एकदा शिकवले की लक्षात राहायचे पुन्हा गृहपाठ करायची गरज नव्हती. चांगले शिक्षण व शिक्षक मिळणे हे विद्यार्थींसाठी अतिशय महत्त्वाचे असते. त्यावेळी फलटण संस्थानमधील मुलींना श्रीमंत मालोजीराजेसाहेबांनी मोफत शिक्षण दिलेले होते, असेही गजानन गोडबोले यांनी स्पष्ट केले.
त्यावेळच्या असलेल्या फलटण शहर व संस्थान बद्दलच्या आठवणींना गजानन गोडबोले यांनी उजाळा दिला.