
दैनिक स्थैर्य । 7 मार्च 2025। फलटण । जागतिक महिला दिनानिमित्त मुधोजी महाविद्यालयाच्या महिला विकास समितीच्यावतीने 8 मार्च रोजी विविध क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कार्य करणार्या महिलांना ‘विजयमाला’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. श्रीमंत अनंतमालादेवी विजयसिंह नाईक निंबाळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ हे पुरस्कार दिले जातात.
महिला पुरस्काराचे हे चौथे वर्ष असून यावर्षी सौ. निलिमा हेमंत दाते (फलटण), सौ. कल्पना दीपक काळंगे (कापसी) व सौ. मनीषा संदीप पवार (राजाळे) यांना अनुक्रमे सर्वोकृष्ट महिला सामाजिक जाणीव जागृती, आदर्श माता आणि सर्वोकृष्ट महिला उद्योजिका हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. महिला विकास समितीच्या अध्यक्षा डॉ. सीता जगताप यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे.
शनिवार दि. 8 मार्च रोजी ज्येष्ठ विचारवंत व महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. सदानंद मोरे यांच्या व श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.
हा कार्यक्रम मुधोजी महाविद्यालयाच्या ऑडिटोरियममध्ये होणार आहे. या कार्यक्रमासाठी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमांमध्ये मुधोजी महाविद्यालयातील सर्व महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. महिला आज सर्वच क्षेत्रात आघाडीवर आणि यशस्वी होताना दिसून येतात. महिलांचे समाजातील स्थान उंचावण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सन्मानित करणे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.
मुधोजी महाविद्यालयाच्या एकूण स्टाफ मध्ये 45 टक्के इतक्या महिला असून महाविद्यालयाच्या सर्वांगीन प्रगतीमध्ये त्यांचे योगदान अत्यंत उल्लेखनीय आहे. त्यामुळे महिलांना प्रोत्साहन देऊन त्यांचे मनोबल वाढवणे या उद्देशाने अशा प्रकारचे उपक्रमांचे आयोजन वेळोवेळी केले जाते. तरी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. पी. एच कदम यांनी केले आहे.