मुधोजी महाविद्यालयाच्या महिला व्हॉलीबॉल संघाचे सलग पाचव्यांदा विजेतेपद; कराडच्या ‘जीसीई’वर मात

शिवाजी विद्यापीठ, सातारा विभागीय स्पर्धेत फलटणचा दबदबा कायम


स्थैर्य, फलटण, दि. २८ सप्टेंबर : मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील महिला व्हॉलीबॉल संघाने आपली विजयी परंपरा कायम राखत, सलग पाचव्या वर्षी शिवाजी विद्यापीठ, सातारा विभागीय महिला व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात त्यांनी गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कराड या संघाचा पराभव केला.

मुधोजी महाविद्यालयाच्या यजमानपदाखाली दि. २६ सप्टेंबर रोजी या स्पर्धा संपन्न झाल्या. स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू अभिजीत इंगळे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी खेळाडूंनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश मिळवावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

या स्पर्धेत महिला महाविद्यालय, कराडने तृतीय, तर शहाजीराजे महाविद्यालय, खटावने चतुर्थ क्रमांक पटकावला. विजेत्या मुधोजी महाविद्यालयाच्या संघात वैष्णवी फडतरे, श्रद्धा शिंदे, प्रतीक्षा शिंदे, संजीवनी जाधव, नूतन महाडिक, सुप्रिया निंबाळकर, ऋतिका चतुरे, आयशा जाधव, शर्वरी जाधव, संध्या जाधव, स्नेहल गुंजाळ आणि तेजस्वी शिंदे यांचा समावेश होता. या संघाला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. स्वप्नील पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

या घवघवीत यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे, प्रशासन अधिकारी अरविंद निकम आणि प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी संपूर्ण संघाचे अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!