
दैनिक स्थैर्य । दि. ३१ ऑक्टोबर २०२२ । फलटण । शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सातारा विभागीय बॉक्सिंग (मुले/मुली) स्पर्धेत (सन 2022-23) मुधोजी महाविद्यालयाचे खेळाडू कु. पृथ्वीराज इवरे याने 86-92 कि.लो.वजन गटात प्रथम क्रमांक मिळवला तसेच कु. संध्याराणी गुंजवटे हिने 81+ कि.लो.वजन गटात प्रथम क्रमांक मिळवला.
मुधोजी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये यावर्षी उज्वल यश संपादन केले. त्यामध्ये प्रामुख्याने हॉलीबॉल, खो-खो, बॉक्सिंग या सर्व खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. पाटील एस.डी. यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन मिळाले.
फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, नियामक मंडळाचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.
प्राचार्य डॉ. पी.एच. कदम व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
महाविद्यालयाचे अनेक खेळाडू सध्या शिवाजी विद्यापीठाच्या संघामध्ये सहभागी झालेले आहेत. महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाची पूर्वपरंपरा कायम राखत खेळाडूंनी आपला शिवाजी विद्यापीठा अंतर्गत स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपली कामगिरी कायम उंचावत नेली आहे याबद्दल क्रीडा संचालक डॉ. पाटील यांचेही अभिनंदन व कौतुक केले जात आहे.