
स्थैर्य, फलटण, दि. २१ सप्टेंबर : शिवाजी विद्यापीठाच्या मिरज येथील बापूजी साळुंखे महाविद्यालयात आयोजित मध्यवर्ती युवा महोत्सवामध्ये फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयाने उत्तुंग यश संपादन केले आहे. महाविद्यालयाने सांघिक फिरता उपविजेता चषक पटकावून विद्यापीठ स्तरावर आपला दबदबा कायम राखला आहे.
या युवा महोत्सवात मुधोजी महाविद्यालयाने लोकनृत्यासाठी ‘जनरल चॅम्पियनशिप’ मिळवण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. याशिवाय, शॉर्ट फिल्म प्रकारात प्रथम क्रमांक, तर शास्त्रीय तालवाद्य, पथनाट्य आणि प्रहसन या कला प्रकारांमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. लोकसंगीत वाद्यवृंदात चौथा आणि पाश्चिमात्य समूहगीत प्रकारात पाचवा क्रमांक मिळवून महाविद्यालयाने एकूण सात पुरस्कारांवर आपले नाव कोरले.
या घवघवीत यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य देशमुख, खजिनदार श्री. हेमंत रानडे, प्रशासकीय अधिकारी श्री. अरविंद निकम आणि गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य यांनी विजेत्या संघाचे आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.
या विजेत्या संघाला प्रा. वळेकर, प्रा. गायकवाड, प्रा. गायत्री पवार, प्रा. देशमुख, प्रा. शेटे, प्रा. दोशी यांच्यासह समितीतील सर्व प्राध्यापकांनी आणि माजी विद्यार्थी कोरिओग्राफर यांनी मार्गदर्शन केले.

