
विद्यार्थ्यांना मिळाले साहित्याचे धडे; डॉ. सुनंदा शेळके यांचे मार्गदर्शन. प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांची प्रमुख उपस्थिती.
स्थैर्य, फलटण, दि. 27 डिसेंबर : लेखनामुळे केवळ अभिव्यक्तीला वाव मिळत नाही, तर त्यातून संवेदनशील आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व घडते, असा सूर मुधोजी महाविद्यालयात उमटला. फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी महाविद्यालय आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सर्जनशील लेखन’ कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी बारामती येथील टी. सी. कॉलेजच्या इंग्रजी विभागातील डॉ. सुनंदा शेळके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
बुधवारी (दि. २४) आयोजित या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना डॉ. सुनंदा शेळके यांनी सर्जनशील लेखनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. कथा, कविता, आत्मकथन, ललित लेखन आणि नाट्यलेखन अशा विविध साहित्यप्रकारांची वैशिष्ट्ये त्यांनी उलगडून सांगितली. “लेखन करताना कल्पकता, भाषाशैली, आशय आणि अभिव्यक्ती यांचा योग्य मेळ घालणे आवश्यक आहे. आपल्या संवेदनशील अनुभवांचे रूपांतर प्रभावी शब्दांत करता आले पाहिजे,” असा मौलिक सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) पी. एच. कदम होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की, “संशोधनाइतकेच महत्त्व सर्जनशील लेखनालाही आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांनी याकडे गांभीर्याने पाहिल्यास त्यांची चिकित्सक विचारशक्ती आणि सामाजिक जाणीव अधिक प्रगल्भ होईल.”
कार्यशाळेची सुरुवात श्रीमंत मालोजीराजे यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. ‘उदय’ मासिकाच्या संपादिका डॉ. सीता जगताप यांनी प्रास्ताविक करताना सर्जनशील लेखनाचे शैक्षणिक आणि सामाजिक महत्त्व विशद केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. सौ. निलम देशमुख यांनी करून दिला.
यावेळी IQAC समन्वयक प्रा. (डॉ.) टी. पी. शिंदे, महाविद्यालय योजना समन्वयक प्रा. एस. डी. पवार, विविध विभागांचे प्राध्यापक आणि साहित्यप्रेमी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्योती काळेल यांनी केले, तर ॲड. डॉ. अशोक शिंदे यांनी आभार मानले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी ‘उदय’ समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

