दैनिक स्थैर्य । दि. ९ मे २०२२ । फलटण । आधुनिक तंत्रज्ञानाचा अध्यापनामध्ये जास्तीत जास्त उपयोग करणे, ही काळाची गरज बनली आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे कोरोना काळातही ऑनलाईन का असेना, अध्ययन- अध्यापनाची प्रक्रिया चालू राहिली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार महाविद्यालयीन प्राध्यापकांनी 60 टक्के अभ्यासक्रम हा ऑफलाईन पद्धतीने व 40 टक्के अभ्यासक्रम हा ऑनलाईन पद्धतीने शिकवावा. असे संकेत दिले आहेत. याकडे आपण सर्व प्राध्यापकांनी सकारात्मक दृष्टीने पाहून ई-कन्टेन्ट डेव्हलपमेंट आत्मसात करावे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. सुनील भोईटे यांनी केले.
मुधोजी महाविद्यालयाच्या प्राचार्य शिवाजीराव भोसले प्राध्यापक प्रबोधिनी व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ई-कन्टेन्ट डेव्हलपमेंट या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित प्राध्यापकांना मार्गदर्शन करण्यासाठी साधन व्यक्ती म्हणून सि. टी. बोरा कॉलेज, शिरूर चे प्रा. डॉ. सुनील भोईटे व अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. एच. कदम उपस्थित होते.
कार्यशाळेत सहभागी प्राध्यापकांना मार्गदर्शन करताना डॉ. भोईटे पुढे असेही म्हणाले की, ई-कन्टेन्ट तयार करणे ही लगेच होणारी गोष्ट नाही. त्यासाठी सुरुवातीला आपणा सर्वांना वेळ द्यावा लागेल. पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागतील. तेव्हाच ते तंत्रज्ञान आपण आत्मसात करू शकतो. एकदा का आपण ई-कन्टेन्ट तयार करायला शिकलो तर त्याचा आपणा सर्वांना आपापल्या विषयाच्या अध्यापनामध्ये नक्कीच फायदा होईल. कार्यशाळेमध्ये डॉ. भोईटे यांनी ओबीएस या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून व्हिडिओ रेकॉर्डिंग, ऑडिओ रेकॉर्डिंग, इमेज प्रस्तुती, पीपीटी रेकॉर्डिंग, कशा प्रकारे करता येते, तसेच ई-कन्टेन्ट तयार करताना घ्यावयाची काळजी याची सविस्तर माहिती प्रात्यक्षिकासह सादर केली.
महाविद्यालयाच्या आय. टी. विभागाचे प्रमुख प्रा. सचिन लामकाने यांनी आपल्या मनोगतात सांगितले की कोणतेही तंत्रज्ञान आत्मसात करताना काही अडचणी येणारच. परंतु त्या अडचणींवर मात करून आपण ई-कन्टेन्ट तयार करायला शिकले पाहिजे. कारण यूजीसी कडून मान्य ऑनलाईन कोर्सेस साठी अशाप्रकारचे ई-कन्टेन्ट फार उपयुक्त ठरणार आहेत. त्यासाठी प्रत्येकाने स्वतःचे ई- कन्टेन्ट तयार केले तर त्याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल.
अध्यक्षीय मनोगतात प्रभारी प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी ई-कन्टेन्ट तयार करणे हे सध्या किती आवश्यक आहे या विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की मॅसिव ओपन ऑनलाईन कोर्सेस करिता प्राध्यापकांच्या कडे ई-कन्टेन्ट डेव्हलप करण्यासाठी अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज असून, त्या माध्यमातून यापुढे यूजीसीच्या 40 टक्के ऑनलाईन कोर्सेस करिता ई-कन्टेन्ट तयार करणाऱ्या प्राध्यापकांचे योगदान महत्त्वाचे ठरेल. त्याच्या तयारीसाठी असे प्रशिक्षण आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांना स्वयम् च्या माध्यमातून अनेक कोर्सेस उपलब्ध होतील. त्यातून कौशल्य विकासाला मदत होईल. महाविद्यालयाच्या गुणवत्तावाढीसाठी ही बाब उल्लेखनीय ठरणार आहे. ई-कन्टेन्ट च्या माध्यमातून आपण आपल्याकडे असणारे ज्ञान हे सहजपणे इतरांपर्यंत पोहोचू शकतो. त्यादृष्टीने सर्वांनी हे तंत्रज्ञान आत्मसात करून अध्ययन-अध्यापन प्रक्रियेमध्ये त्याचा वापर करावा. तसेच या ई-कन्टेन्ट च्या माध्यमातून स्वतःचे असे ऑनलाईन कोर्स देखील घेता येऊ शकतील.
प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राचार्य शिवाजीराव भोसले प्राध्यापक प्रबोधिनी समितीचे प्रमुख प्रा. डॉ. एन. के. रासकर यांनी करून दिला. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत होणाऱ्या उपक्रमांची माहिती सांगून, प्राध्यापक प्रबोधिनी चा उद्देश स्पष्ट केला. याप्रसंगी महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ. एस. जी. दीक्षित, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. टी. पी. शिंदे सह-समन्वयक प्रा. कु. जे. पी. बोराटे, प्रा. सचिन लामकाने व प्राध्यापक वृंद बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्र-संचालन प्रा. अभिजीत धुलगुडे यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. ललित वेळेकर यांनी मानले.