
स्थैर्य, फलटण, दि. ९ ऑक्टोबर : फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आपला वाढदिवस साजरा न करता पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत, मुधोजी महाविद्यालयाने पूरग्रस्तांसाठी मदत संकलन करण्याचा उपक्रम राबवला. गोळा झालेले मदत साहित्य आज, दि. ९ ऑक्टोबर रोजी संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत पूरग्रस्त भागाकडे हस्तांतरित करण्यात आले.
विदर्भ, मराठवाडा आणि सोलापूर येथील पूरस्थिती पाहता, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने महाविद्यालयात दि. ७ व ८ ऑक्टोबर रोजी हा मदत संकलन उपक्रम राबवण्यात आला. याला विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामध्ये ५० किलो गहू, ५० किलो तांदूळ, २९ किलो साखर यांसारख्या जीवनावश्यक वस्तू, ४३ साड्या व २० ड्रेस असे कपडे आणि ३ पोती भांडी जमा झाली.
यावेळी बोलताना संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी, “आपत्तीग्रस्तांना मदत करणे ही सर्वांची जबाबदारी असून, मुधोजी महाविद्यालयाने घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे,” असे प्रतिपादन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी, या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये समाजाप्रती दायित्वाची जाणीव निर्माण झाल्याचे सांगितले.
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. फिरोज शेख, प्रा. प्रशांत शेटे आणि डॉ. वैशाली कांबळे यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला. कार्यक्रमास संस्थेचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, शिक्षक व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते.