मुधोजी बालक मंदिरात वार्षिक स्नेहसंमेलनाचा जल्लोष; चिमुकल्यांच्या कलाविष्कारांनी रंगली मैफल


फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी बालक मंदिरात वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन उत्साहात. मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा गौरव व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी.

स्थैर्य, फलटण, दि. १९ फेब्रुवारी : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी बालक मंदिर, फलटण या प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारांनी आणि पालकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. प्राजक्ता दोशी (बालरोग तज्ञ, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे) तसेच सौ. तृप्ती संजय कुलकर्णी (ज्ञानप्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन विभाग – हिरकणी/आरोग्य सखी प्रकल्प प्रमुख, पुणे) उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी सौ. वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर (गव्हर्निंग कौन्सिल सदस्या व चेअरमन – मुधोजी बालक व प्राथमिक विद्यामंदिर) होत्या.

कार्यक्रमास गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, संस्थेचे प्रशासन अधिकारी, विविध शैक्षणिक अधिकारी, मुख्याध्यापिका तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागतगीताच्या नृत्य सादरीकरणाने झाली. मुख्याध्यापिका सौ. रजपूत यांनी प्रास्ताविक करत वर्षभरातील शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांचा सविस्तर आढावा सादर केला. सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

संस्थेचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे विजयसिंह नाईक निंबाळकर यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सायकल स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

डॉ. प्राजक्ता दोशी यांनी आपल्या भाषणात लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत “बालकांना योग्य संधी दिल्यास ते उत्तम घडतात,” असे सांगितले.

सौ. तृप्ती कुलकर्णी यांनी शाळेतील विविध उपक्रमांचे कौतुक करत छोट्या बालचमूंच्या सादरीकरणाने आनंद झाल्याचे नमूद केले.

अध्यक्षीय भाषणात सौ. वसुंधरा नाईक निंबाळकर यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकवृंदाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशालेत सातत्याने विविध उपक्रम राबवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांनी आई-बाबा, शाळा, अभ्यास, आजी-आजोबा, गणपती, देशभक्ती, महाराष्ट्रातील सण-उत्सव, चंद्र-तारे अशा विविध विषयांवरील गीते व नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. शेवटी मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘पसायदान’ने कार्यक्रमाची सांगता भक्तीमय वातावरणात झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. भोसले मॅडम व सौ. गोसावी मॅडम यांनी केले.

मुधोजी बालक मंदिराच्या या स्नेहसंमेलनाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देत पालक-शिक्षक-विद्यार्थी यांचा सुंदर संगम घडवून आणला.


Back to top button
Don`t copy text!