एमटीडीसीच्या निवास व न्याहारी योजनेद्वारे पर्यटक सुविधांबरोबरच उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होईल – पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ फेब्रुवारी २०२२ । मुंबई । महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) निवास, न्याहारी तसेच महाभ्रमण योजनेच्या माध्यमातून पर्यटकांना सोयी-सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच ग्रामीण भागातील उद्योजक यांना उद्योगसंधी आणि सर्वसामान्यांना उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होईल, असा विश्वास पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील पर्यटन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर बाधित झाले. आता परिस्थिती हळूहळू सुरळीत होत असल्याने एमटीडीसीमार्फत निवास व न्याहारी आणि महाभ्रमण योजनेबाबत माहिती देणारी दोन दिवसांची कार्यशाळा नुकतीच दिवेआगर येथे आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन राज्यमंत्री कु. तटकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींसह योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेत एमटीडीसीचे महाव्यवस्थापक दिनेश कांबळे यांनी योजनेच्या सादरीकरणाद्वारे पर्यटन संकल्पनांच्या व्यावसायिक संधी, शासकीय योजनांचे स्वरूप यांची माहिती देऊन त्याबाबतचे प्रशिक्षण दिले.

पर्यटन राज्यमंत्री कु.तटकरे म्हणाल्या, रायगड जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. एमटीडीसीच्या विविध योजनांचा उद्योजकांनी येथे नक्कीच लाभ घ्यावा. महामंडळाने या योजनेत अधिकृतरित्या नोंदणीसाठी काही अटी शर्ती आखल्या असून नोंदणी केल्यानंतर पर्यटकांना काय सुविधा द्याव्या, पर्यटकांच्या निवासासाठी काय कार्यपद्धती असावी याचे मार्गदर्शन करण्यात येते. ग्रामीण भागातील पर्यटनाच्या व्यावसायिक संधीबाबत तरुणवर्ग जागरूक होत आहे ही एक सकारात्मक बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी निवास व न्याहारी योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या व्यावसायिकांना राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते नोंदणी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

एमटीडीसीच्या निवास व न्याहारी तसेच महाभ्रमण योजनांना आजवर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून पर्यटन क्षेत्रात या उपक्रमांचे महत्त्व सिद्ध झाले आहे. ग्रामीण भागातील उद्योजकांना तसेच सामान्य जनतेला उत्पन्नाचा स्रोत म्हणून निवास व न्याहारी योजनेअंतर्गत नोंदणी करून आपली जागा, कक्ष किंवा निवास व्यवस्था पर्यटकांसाठी विविध सांस्कृतिक अनुभवांसह परवडणाऱ्या दरात प्रदान करता येते. अधिकाधिक लोकांपर्यंत या योजनांची माहिती पोहोचवली जावी या उद्देशाने या कार्यशाळेत सहभागी झालेल्या इच्छुकांना या योजनांचे स्वरूप व त्याबाबतची माहिती दिली गेली.


Back to top button
Don`t copy text!