एसटीचा भोंगळ कारभार! टूलकिट नाही, स्टेपनीही पंक्चर; फलटणजवळ ‘शिवाई ई’ बसमधील प्रवाशांचा दोन तास खोळंबा


पंढरपूरहून पुण्याला जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या ‘शिवाई ई’ (Shivai E) इलेक्ट्रिक बसचा फलटणजवळ श्रीराम कारखान्यासमोर बिघाड झाला. गाडीत टूलकिट नसून, स्टेपनीही पंक्चर निघाल्याने ज्येष्ठ नागरिकांसह प्रवाशांना दोन तास नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

स्थैर्य, फलटण, दि. ४ मार्च : पंढरपूरवरून पुण्याला जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) ‘शिवाई ई’ (इलेक्ट्रिक बस – क्रमांक MH 49 BZ 8107) बसचा फलटण नजीक महाराष्ट्र राज्य वखार महामंडळजवळ बिघाड झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. गाडीत साधे टूलकिट नसणे आणि स्टेपनीही पंक्चर निघाल्याने एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

टूलकिट नाही अन् प्रशिक्षणाचाही अभाव

मंगळवारी (दि. ३ मार्च) रात्रीच्या वेळी ही घटना घडली. बसचे चाक पंक्चर झाल्यानंतर ती बदलण्याची वेळ आली, तेव्हा गाडीत टायर उघडण्यासाठी लागणारे आवश्यक ‘टूलकिट’ उपलब्ध नसल्याचे उघड झाले. त्यातच चालकाला स्टेपनी खोलण्याचे आणि जोडण्याचे योग्य प्रशिक्षणच दिले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. या सर्व गोंधळात जेव्हा स्टेपनी बाहेर काढली, तेव्हा ती स्टेपनी सुद्धा आधीपासूनच पंक्चर असल्याचे निदर्शनास आले.

ज्येष्ठ नागरिकांसह प्रवासी ताटकळले

प्रशासनाच्या या अत्यंत निष्काळजीपणामुळे बसमधील लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना रात्रीच्या अंधारात तब्बल पावणेदोन ते दोन तास रस्त्यावर ताटकळत उभे राहावे लागले. पर्यायी व्यवस्था लवकर न झाल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता.

वेळेचा गोंधळ आणि अतिवेगाचा संशय

एसटीच्या अधिकृत ॲपनुसार ही बस पंढरपूरवरून दुपारी ४:०० वाजता निघाली होती. मात्र, सायंकाळी ५:५० वाजता प्रवाशांना बस श्रीराम कारखान्याजवळ आल्याचा फोन आला. याचाच अर्थ पंढरपूर ते फलटण हे सुमारे ११० किलोमीटरचे अंतर बसने दोन तासांपेक्षा कमी वेळेत पार केले. या वेळेच्या गोंधळामुळे आणि प्रशासनाकडून योग्य संवाद न साधला गेल्याने प्रवाशांच्या सुरक्षेबाबतही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अत्याधुनिक समजल्या जाणाऱ्या ‘शिवाई ई’ बसमध्ये अशा प्रकारच्या प्राथमिक सुविधाही (Stepney & Toolkit) नसणे, हे अत्यंत खेदजनक असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.


Back to top button
Don`t copy text!