दैनिक स्थैर्य । दि. ०६ डिसेंबर २०२१ । सातारा । सातारा शहरातील मंगळवार पेठ परिसरातील लेले हॉस्पिटल ते फडके हॉस्पिटल या मार्गावर स्थानिक नगरसेवक सुहास राजेशिर्के यांच्या पाठपुराव्यानंतर महावितरणने हाय व्होल्टेज अंडरग्राऊंड लाईन टाकल्याने येथील नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची समस्या दूर झाली आहे. परिणामी, या रस्त्यावर राहणाऱ्या आणि आजुबाजूच्या परिसरातील शेकडो कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.
सातारा येथील मंगळवार पेठेतील लेले हॉस्पिटल ते फडके हॉस्पिटल या मार्गावर अनेक उंच इमारती तसेच अपार्टमेंट आहेत. येथे राहणारे स्थानिक आणि भाडेकरुंची संख्या शेकडोंच्या घरात आहे. त्यातच या मार्गावर असणाऱ्या इमारतीवरून महावितरणची २२ केव्ही व्होल्टेज हायटेन्शन लाईन गेली असल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. या भागात दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांना तर जीव मुठीत धरून राहावे लागत होते. शॉक लागण्याच्या मोठा धोका निर्माण झाला होता. पावसाळ्यात तर येथे बिकट परिस्थिती असायची. अनेकांना शॉक लागल्याच्या तक्रारी होत्या. काही ठिकाणी शॉर्टसर्किटही झाले होते.
दरम्यान, या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी आपली ही समस्या स्थानिक नगरसेवक सुहास राजेशिर्के यांच्या कानावर घातली होती. त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी काय करता येईल, या अनुषंगाने त्यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता सुनीलकुमार माने, अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र माने, शाखा अभियंता जितेंद्र पाटील तसेच अन्य अधिकाऱ्यांशी ही चर्चा केली आणि या मार्गावर अंडरग्राउंड लाईन टाकून ती कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ते काम सुरू करण्यात आले आणि काही दिवसांतच ते पूर्णही झाले. दरम्यान, अंडरग्राऊंड लाईन टाकल्याने आता येथील लोक टेन्शन फ्री झाले आहेत.
काही दिवसांपूर्वीच चिमणपुरा पेठेत हाय टेन्शन लाईनमुळे एकाचा शॉक लागून मृत्यू झाला होता. ही घटना गंभीर असल्याचे लक्षात घेऊन आणि आपल्या भागात असा प्रकार कुठेही घडता कामा नये, याची काळजी घेतली होती. सातारा येथील मंगळवार पेठेतील लेले हॉस्पिटल ते फडके हॉस्पिटल या मार्गावरील अनेक घरातील लोक जीव मुठीत धरूनच राहत होते. त्याला कारण म्हणजे येथील लोकांच्या घरावरून हाय टेन्शन लाईन गेली होती. मात्र ही लाइन आम्ही अंडरग्राउंड केल्यामुळे येथील मोठा प्रश्न कायमचा संपवून टाकला आहे.
– सुहास राजेशिर्के, नगरसेवक, सातारा