दैनिक स्थैर्य । दि. २१ जून २०२२ । सातारा । लोणंद (ता. खंडाळा) येथील शेतकऱ्याच्या शेतीला वीज जोडणी देण्यासाठी 12 हजारांची लाच स्विकारणाऱ्या महावितरणचा कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले आहे. शरद ओंकेश्वर ओंकार (मुळ रा. वर्धा, सध्या रा. लोणंद) असे त्या अभियंत्याचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, लोणंद येथील एका शेतकऱ्याने शेतीला वीज जोडणीसाठी ओमकार याच्याकडे मागणी केली होती. ती वीज जोडणी देण्यासाठी ओंकार याने संबंधित शेतकऱ्याला 20 हजार रूपयांची लाच मागितली होती. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याने सातारा एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानंतर एसीबीने तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता, ओंकार हे तडजोडीअंती 12 हजाराची लाच मागणी करत असल्याचे निष्पन्न झाल्यावर एसीबीने सापळा लावला होता. त्यानंतर शेतकऱ्याकडून बारा हजार रूपयांची लाच स्विकारताना “एसीबी’ने रंगेहात पकडले. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपाधाक्षीक सुजय घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन राऊत, हवालदार विनोद राजे, संभाजी काटकर, मारुती अडागळे यांनी केली.