तहसील कार्यालयाचा वीजपुरवठा महावितरणने तोडला; थकबाकीची रक्कम लाखात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, कोपरगाव, दि.२५: वीजबिल वसुलीची मोहिम महावितरणकडून सुरू आहे. शेतीपंपाची वीज ही अनेक गावांत तोडण्यात आली आहे. आता तर थकीत वीजबीलासाठी महावितरणने कोपरगाव तहसील कार्यालयाचा विद्युत पुरवठा थांबविला आहे. त्यामुळे तहसील कार्यालयाचे कामकात ठप्प होऊन कार्यालय अंधारात बुडाले आहे.

वीजबीलाची थकबाकी वसुलीसाठी महावितरणने आक्रमक मोहीम सुरू केली आहे. त्यात शेतीपंपाचा पुरवठा खंडीत केला आहे. अनेक गावे अंधारात बुडाले आहेत. आता तर सरकारी कार्यालयाकडे महावितरणने मोर्चा वळविला आहे.

कोपरगाव तहसील कार्यालयाचे 3 लाख 90 हजार 430 व 1 लाख पंधरा हजार 140 तर तहसीलदार निवासचे 19 हजार 540, तलाठी कार्यालयाचे 14 हजार असे चार वीज देयकाचे एकत्रित मिळून तब्बल पाच लाख रुपये थकबाकी आहे.

जिल्ह्यातील प्रथम थकबाकीदार शंभरामध्ये तहसीलचा क्रमांक असल्याने महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी कोपरगाव येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता भगवान खराटे यांना तहसील कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वीजपुरवठा खंडित केल्याने तालुक्याची महसूल यंत्रणा ठप्प झाली.

संगणकीय प्रणालीवर चालणार्‍या कामकाजामुळे संपूर्ण महसूल यंत्रणा वीजप्रवाहा अभावी थांबली आहे. वारंवार सूचना ,पत्रव्यवहार ,प्रत्यक्ष भेट चर्चा करून ही थकीत बाकी न भरल्याने अखेर नाईलाजाने वीजपुरवठा खंडित करण्याची वेळ आली असल्याचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता भगवान खराटे यांनी सांगितले.

महावितरणकडे महसूलची रक्कम

वरिष्ट पातळीवरून अपेक्षित रकमेचे निधी न आल्याने वीजबील भरले नाही. परंतु महावितरणकडे देखील महसूल विभागाची नॉन अग्रीकल्चर करापोटी तब्बल दोन लाख 21 हजार रुपयांची थकबाकी येणे असल्याची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!