स्थैर्य, वाई, दि. २५ : कोरोना महामारी रोखण्यासाठी आयुर्वेदाचा वापर होणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन वाईच्या प्रांताधिकारी सौ. संगीता चौगुले राजापूरकर यांनी आयुर्वेद सिटीच्या सदिच्छा भेटीत केले.
सध्या कोरोना महामारीचा कम्युनिटी स्प्रेड वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर वाई- महाबळेश्वर व खंडाळ्याच्या उपजिल्हाधिकारी संगीता चौगुले राजापूरकर यांनी आयुर्वेद सिटीला सदिच्छा भेट देऊन भविष्यात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी, आयुर्वेदिक औषधांचा कसा उपयोग करता येईल याबद्दल सविस्तर चर्चा केली.
यावेळी आयुर्वेदातील प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीच्या औषधोपचाराची, पांचभौतिक चिकित्सा व पंचकर्म चिकित्सेबद्दलची तसेच आयुर्वेदसिटी मध्ये प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीच्या उपाययोजनांची सविस्तर माहिती आयुर्वेद सिटीचे संस्थापक डाॅ मिलिंद काकडे यांनी दिली.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ अविनाश पाटील , खंडाळा तालुक्याचे बीडीओ बिचकुले , लोणंद नगरपंचायतचे मुख्याधिकारी हेमंत ढोकले तसेच लोणंद मेडिकल असोसिएशनचे सचिव डाॅ. राहूल क्षीरसागर व खजिनदार डाॅ अवधुत किकले हे उपस्थित होते.
डाॅ. मिलिंद काकडे हे लोणंद मेडिकल असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष असून, असोसिएशनच्या माध्यमातून कोरोना विरोधी लढ्यातील पहिलं पाऊल असलेले “रक्षक क्लिनिक” तसेच “डाॅक्टर्स डे” निमित्त भव्य रक्तदान शिबिर, आयुर्वेद सिटी परिवारातर्फे कम्युनिटी किचनला अन्नदान इ. अनेक समाजोपयोगी कार्यक्रमाचे यशस्वीपणे आयोजन करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. या कार्यात डाॅ.ज्योती काकडे यांची बहुमोल साथ लाभली आहे.