
दैनिक स्थैर्य | दि. 17 जुन 2025 | फलटण | पुण्यश्लोक अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक ट्रस्ट आणि ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्यावतीने कराड येथील कार्यक्रमात राज्यातील विविध क्षेत्रातील १४१ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला, त्यामध्ये फलटण येथील जुन्या पिढीतील प्रसिद्ध फोटोग्राफर कै. व्ही. बी. चांगण, यांच्या पत्नी उत्कृष्ट महिला फोटो ग्राफर व सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती कौशल्या विठ्ठलराव चांगण यांना अहिल्यारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यशवंतराव चव्हाण सभागृह, कराड येथे रविवार दि. १५ जून रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमात आदर्श माता व अहिल्यारत्न पुरस्कार वितरण समारंभपूर्वक करण्यात आले.
या कार्यक्रमास माजी आमदार रामहरी रुपनवर, जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब कर्णवर – पाटील, श्रीमंत योगीराज संजयसिंह गायकवाड (कोल्हापूर), राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष बलवंत पाटील, उद्योगपती बाळासाहेब खरात, ग्रामीण कथाकार प्रा. रविंद्र कोकरे , नगरसेवक अशोकराव शेडगे, कृगर कंपनी ठाणेचे जनरल मॅनेजर संपतराव शेंडगे, आरटीओ इन्स्पेक्टर सौरभ दडस, कराडचे माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे आजीव सदस्य उत्तमराव गलांडे, उद्योगपती हनुमंतराव दुधाळ, सुनील शेंडगे, मुंबई म्हाडाचे अधिकारी शंकरराव विरकर, मलकापूरचे माजी नगरसेवक आबासाहेब गावडे, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संभाजीराव काकडे, कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक व ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे हे उपस्थित होते.
येथील जुन्या पिढीतील प्रख्यात फोटोग्राफर कै. व्ही. बी. चांगण यांनी व्यावसायिक फोटोग्राफर म्हणून काम करताना नैसर्गिक फोटो ग्राफिला प्राधान्य देत विविध ठिकाणची बहरलेली वृक्षराजी, नदी नाले यांच्या काठावरील विविध वृक्ष आणि तेथे विविध हंगामात येणारे पक्षी, काही ठिकाणी जंगल असेल तर तेथून पाणवठ्यावर येणारी जंगली श्वापदे यांचे अत्यंत उत्कृष्ट फोटो ग्राफ्स त्यांनी आपल्या कार्यकाळात काढले.
तसेच सिने नाट्य क्षेत्रातील कलावंत फलटण येथे येत त्यावेळी त्यांचे विविध पोज मधील फोटो काढण्यात त्यांचा हातखंडा होता.
आपली ही कला त्यांनी पत्नी, मुले, मुली यांनाही शिकविली, आज त्यांचा धाकटा मुलगा किरण उर्फ बंडू चांगण उत्कृष्ट फोटो ग्राफर म्हणून येथे कार्यरत आहे.