
दैनिक स्थैर्य । दि. २४ सप्टेंबर २०२२ । फलटण । पद्मभुषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील स्थापीत व आशिया खंडात सर्वात मोठी असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य म्हणून फलटण येथील सौ. प्रतिभा चेतन शिंदे यांची निवड झाली आहे. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निवडीबद्दल शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.
सौ. प्रतिभा शिंदे या राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते व शरद पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे सुभाषराव शिंदे यांच्या सुनबाई तर फलटण पंचायत समितीचे माजी उपसभापती चेतन शिंदे यांच्या पत्नी आहेत. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीत सदर निवड करण्यात आली आहे. त्यांचे सहीचे पत्र सौ. प्रतिभा शिंदे यांना मिळाले आहे. या पत्रामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीत आपली निवड झाली आहे. त्याबद्दल मी आपले व्यक्तिशः व संस्थेच्यावतीने हार्दिक अभिनंदन करतो. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण दिलेले योगदान महत्वपुर्ण आहे. आपल्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा फायदा रयत शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना निश्चितपणे होईल हा विश्वास आहे.
सदर निवडीबद्दल शिंदे यांचे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनील पाटील, व्हा. चेअरमन ॲड. भगिरथ शिंदे, सचिव प्रा. डॉ. विठ्ठलराव शिवणकर, ॲड. दिलावर मुल्ला, सहसचिव प्रा. डॉ. शिवलिंग मेनकुदळे, माध्यमिक विभागाचे सहसचिव राजेंद्र साळूंखे, समन्वयक दत्ताजीराव सूर्यवंशी आदींसह राजकीय, सामाजिक, शैक्षणिकसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन व्यक्त केले आहे.