
स्थैर्य, सातारा, दि. 7 : सातारा विकास आघाडी दिलेली वचने पूर्ण करते. बाकीच्यांचे मला माहिती नाही, पण सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांनी जे काम हाती घेतले. ते तडीस नेले. यादोगोपाळ पेठेतील स्व. श्री. छ. प्रतापसिंह महाराज उर्फ दादा महाराज उद्यान पूर्णत्वास नेणारच अशा शब्द खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिला. दरम्यान, साविआच्या वचननाम्यातील उद्यानाचा प्रश्न लवकरच निकाली काढण्यात येणार आहे, अशी माहिती माजी उपनगराध्यक्षा सौ. दीपाली गोडसे यांनी दिली.
सातारा शहरातील विविध विकासकामाच्या पाहणी दरम्यान त्यांनी यादोगोपाळ पेठेतल्या कै. श्री. छ. प्रतापसिंह महाराज उर्फ दादा महाराज उद्यानास भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, पाणी पुरवठा सभापती यदुनाथ नारकर, नियोजन सभापती ज्ञानेश्वर फरांदे, माजी उपनगराध्यक्ष सौ. दीपाली गोडसे, अॅड. डी. जी. बनकर, राजू गोडसे, अभियंता शिंदे यांच्यासह पेठेतील नागरिक उपस्थित होते.
यावेळी सौ. दीपाली गोडसे म्हणाल्या, 2008 साली सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून खा. उदयनराजे यांच्या नेतृत्वाखाली यादोगोपाळ पेठेतून निवडणूक लढण्याची संधी मिळाली. यावेळी या भागातील 134 व 134 अ यादोगोपाळ पेठ येथील जागेवर बगीचाचे आरक्षण गेले अनेक वर्ष होते. हा विषय महाराजसाहेबांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी सर्वसाधारण सभेत ठराव करून ती जागा पालिकेकडे हस्तांतरित करण्यास सांगितले. 2008 साली ठराव करून जिल्हाधिकार्यांकडे प्रस्ताव सादर केला. जिल्हाधिकार्यांनी ती जागा 2011 मध्ये विनामोबदला पालिकेकडे हस्तांतरित केली. तेथील स्थानिक मुस्लिम बांधवांनी ही जागा त्यांची असल्यासंदर्भात वक्फ बोर्डाकडे तक्रार केली. याबाबत त्यावेळी मी औरंगाबाद न्यायालयात दाद मागितली. त्यावर सादिक शेख, अस्लम बागवान यांनी खा. उदयनराजे यांच्याकडे मध्यस्थी करण्यासंदर्भात विनंती केली. त्यानंतर तत्कालीन मुख्याधिकारी अभिजित बापट, अॅड. डी. जी. बनकर, सतीश साखरे, अभियंता शिंदे, वक्फ बोर्डाचे पदाधिकारी यांच्यात चर्चा होवून दाखल तक्रार माघार घेण्यात आली. नगरपालिकेस बगीचा विकसित करण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर 4 नोव्हेंबर 2016 रोजी खा. उदयनराजे, श्री. छ. सौ. दयमंतीराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. या कामासाठी उदयनराजे यांच्या मार्गदर्शनाखाली मी सलग दहा वर्ष पाठपुरावा करून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत कै. श्री. छ. प्रतापसिंह महाराज उर्फ दादा महाराज उद्यान विकसित करण्यासाठी सुमारे 3 कोटी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला तसेच त्या कामांचे टेंडर सुद्धा काढले. परंतु 2016 च्या पालिका निवडणुकीत या भागात सातारा विकास आघाडीचा नगरसेवक नसल्याने हे काम आम्ही केले असे काही जण म्हणत आहेत. पण त्यात कोणतेही तथ्य नसून या कामाचे श्रेय फक्त आणि फक्त उदयनराजे व सातारा विकास आघाडीला जाते. श्रेय घेण्याचा कोणीही प्रयत्न करू नये तसेच या उपक्रमासाठी मुस्लिम बांधवांनी केलेल्या सहकार्यासाठी त्यांचेही आभार सौ. दीपाली गोडसे यांनी मानले.