स्थैर्य,सातारा, दि. २७: गेले अनेक वर्षांपासून आनेवाडी टोलनाक्याचा प्रश्न गाजत आहे. रस्ते दुरुस्ती असेल अथवा स्थानिकांसाठीची टोलमाफी असेल या दोन्ही प्रश्नांसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधीत ठेकेदार जिल्हा प्रशासनाला जुमानत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. टोलच्या बाबतीत खा. उदयनराजे यांनी घेतलेली भुमिका अगदी रास्त आहे. ज्या पध्दतीने खा. सुप्रिया सुळे यांनी खेड- शिवापूर टोलनाक्याबाबत आंदोलनाची भुमिका घेवून एम. एच. १२ आणि एम.एच. १४ या वाहनांसाठी निर्णय घेतला त्याच पध्दतीने खा. उदयनराजे आणि खा. श्रीनिवास पाटील यांनी आनेवाडी आणि तासवडे या दोन टोलनाक्यांवर एम.एच.११ आणि एम.एच. ५० या वाहनांसाठी टोलमाफी मिळावी म्हणून निर्णय घ्यावा. वेळप्रसंगी आंदोलन करावे लागले तर, स्थानिक आमदार म्हणून मी शंभर टक्के खासदारांच्या सोबत आहे, असे स्पष्ट मत आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.
खा. उदयनराजे यांनी टोलबाबत नुकतीच आपली भुमिका स्पष्ट केली होती. यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी त्यांच्या भुमिकेचे स्वागत केले आहे. प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, सेवा रस्ते आणि महामार्गाची दुरावस्ता, स्थानिकांसाठी टोल सवलत आदी प्रश्नांसाठी वारंवार आंदोलने झाली आहेत. टोल नाके हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित आहेत. त्यामुळे संबंधीत अधिकारी आणि ठेकेदार हे जिल्हा प्रशासनाला अजिबात जुमानत नाहीत. रस्त्यांची दुरुस्ती, टोलमध्ये सवलत आदी प्रश्नांबाबत जिल्हा प्रशासनाने बोलावलेल्या कोणत्याही बैठकीला संबंधीत अधिकारी आणि ठेकेदार उपस्थित रहात नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासन हे प्रश्न सोडवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. खेड- शिवापूर येथील टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमध्ये सवलत मिळावी म्हणून खा. सुप्रिया सुळे यांनी आंदोलनाचा पवित्रा घेवून स्वत:च्या पातळीवर हा प्रश्न सोडवला. त्यामुळे एम.एच. १२ आणि एम.एच. १४ पासिंग असलेल्या स्थानिकांच्या वाहनांना टोलमाफी मिळाली.
सद्य परिस्थिती पाहिल्यास टोलनाके हे भ्रष्टाचाराचे कुरण झाल्याचे चित्र आहे. टोलनाक्यावर बोगस पावत्याद्वारे चालू असलेला भ्रष्टाचार नुकताच उघड झाला आहे. टोलनाक्यांवरील भ्रष्टाचार बंद होणे आणि स्थानिकांच्या वाहनांना टोलमाफी मिळणे अत्यावश्यक आहे. खा. सुप्रिया सुळे यांच्याप्रमाणेच सातार्यातील दोन्ही खासदारांनी आनेवाडी आणि तासवडे या दोन टोलनाक्यांवर एम.एच. ११ आणि एम.एच. ५० पासिंग असलेल्या स्थानिकांच्या वाहनांना टोलमाफी मिळण्यासाठी कठोर भुमिका घ्यावी. वेळप्रसंगी आंदोलन करावे लागले तर स्थानिक आमदार म्हणून मी शंभर टक्के खासदारांच्या सोबत राहून हा प्रश्न सोडवण्यासाठी संपुर्ण सहकार्य देईन, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.