स्थैर्य, सातारा, दि.०८: मराठा आरक्षणप्रश्नी खासदार, आमदारांना आडवा, त्यासंदर्भात त्यांना जाब विचारा, त्यांच्याकडे बोलण्यासारखे आता काही राहिले नाही. त्यांना मतदार संघात फिरू देऊ नका. यापूर्वी समाजामुळे आपण लोकप्रतिनिधी आहोत, असे सगळ्यांना वाटत असे. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे माझ्यामुळे समाज आहे, अशी धारणा झाल्यामुळे जनताच लोकप्रतिनिधींची मस्ती उतरवेल अशा शब्दात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आज आरक्षणप्रश्नी प्रतिक्रिया व्यक्त केली.
कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता काय उपाययोजना केल्या पाहिजेत या संदर्भात खा. उदयनराजे भोसले यांनी या आज जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकार्यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली तद्नंतर ते प्रसिद्धिमाध्यमांशी बोलत होते.
खा. उदयनराजे भोसले पुढे म्हणाले, मराठा आरक्षणाचा निकाल पाच तारखेला जाहीर करण्यात आला. वाट्टेल त्या परिस्थितीत कुणालाही हा निकाल मान्य नसून इतर समाजाला आरक्षण दिले गेले तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात अभ्यास झाला का असा प्रश्न उपस्थित करत गायकवाड समितीने मराठा आरक्षणासंदर्भात अहवाल दिला असतानाही सर्वोच्च न्यायालयाने मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही, असा निकाल दिला. शासन काय करतय असा प्रश्न उपस्थित करत ते पुढे म्हणाले, शासन अद्याप खुलासा का करत नाही. आमचे मित्र अशोक चव्हाण म्हणतात पेपर आल्यानंतर अभ्यास करून त्यावर प्रतिक्रिया दिली जाईल मात्र ते काहीही म्हणत असले तरी, मराठा समाजावरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे मराठी युवकांचे आयुष्य अंधारमय झाले आहे. न्यायालयाचा निकाल कोणालाच मान्य नसल्याचा पुनरुच्चार करून ते पुढे म्हणाले, मराठा समाजाला सोडून अन्य समाजांना आरक्षण दिले जाते मात्र मराठ्यांना कोण बाजूला करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. मराठा आरक्षण प्रश्नी नेमलेला वकील न्यायालयात हजर राहत नाही. न्यायालयात आरक्षणाची माहिती वेळेवर दिली जात नाही. जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा हा एक डाव असून यांच्यापेक्षा जनावरे परवडली अशा शब्दात उदयनराजे भोसले यांनी आपला उद्वेग व्यक्त केला.
कोरोना परिस्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले, आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यासमवेत बैठक झाली. या बैठकीत कामकाजात सुसूत्रता आणण्याच्या सूचना देण्यात आल्या असून खासदार निधीच्या माध्यमातून ऑक्सीजन प्लांटसाठी निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून केंद्र सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यात 17 ठिकाणी ऑक्सीजन प्लांट उभारण्यात येणार आहे. त्यापैकी 12 प्लांटला मान्यता मिळाली आहे.
जगात वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस आहेत. त्यापैकीच एक कोरोना हा एक व्हायरस आहे. देशातील सायंटिस्ट लोकांनी एकत्र येऊन रेमडीसिवर या इंजेक्शनच्या दुष्परिणामांची माहिती देण्याची गरज आहे. या कठीण प्रसंगात नागरिकांनी लिंबू, आले, साखर, मीठ, ऑरेंज ज्यूस याचा वापर करावा असे आवाहन करून रयत शिक्षण संस्थेच्या मोकळ्या इमारतींचा आयसोलेशन साठी वापर करण्यात यावा अशा सूचना आपण केलेल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.