
दैनिक स्थैर्य | दि. ०६ फेब्रुवारी २०२३ | फलटण | नीरा-देवघरचे धरण बांधण्यासाठी निरढोशी खोर्यात मी फिरलो. मी त्यावेळी साधा अपक्ष आमदार होतो. निरढोशी खोर्यात धरण बांधण्यासाठी आनंदराव थोपटे विरोध करत होते. पण, मी जीवावर उदार होऊन त्या खोर्यात फिरलो. लोकांचा विश्वास संपादन केला. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना शिरवळला नीरा-देवघर धरणाचे भूमिपूजन करून तेथे ११ टीएमसीचे धरण बांधले. नीरा-देवघरचा हत्ती लहानाचा मोठा मी केला. मी कष्ट घेतले. आता खासदार म्हणतात की निरा-देवघर आम्ही केले. खासदार खोटारडे असून ते फक्त धमक्या देत असतात, अशी टीका विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर केली.
वाठार निंबाळकर येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीमंत रामराजे पुढे म्हणाले की, कृष्णा महामंडळाला कर्जरोख्याला सुरुवातीला १६०० कोटींची तरतूद झाली नसती तर नीरा-देवघर सोडाच उरमोडी, तारळी, टेंभू यांची कामे मार्गी लागली नसती. २००० साली आमदार निवासात असताना कृष्णा लवादाचा पाणी वाटपाचा पहिल्यांदा कायदा वाचून त्यावेळी जे पाणी अडविले नसेल त्या पाण्याचे फेरवाटप करून त्या कायद्याची फेररचना केली. त्यावेळी ते पाणी आंध्र व कर्नाटकला द्यावे अशाप्रकारचा कायदा होता. याचा विचार अपक्ष आमदार म्हणून मी केला. हे जर झाले नसते तर व प्रकल्पग्रस्तांनी मला त्यावेळी साथ दिली नसती तर उरमोडी धरण स्थळावर कोणाला येऊ देत नसतानाही मी व अभयसिंहराजे भोसले तेथे जाऊन बसलो. आ. पाटणकर त्यावेळी आमच्याबरोबर होते. सरकारी काम म्हणून आम्ही ते केले नाही तर आपल्या शेतकर्यांसाठी ते मी केले. आणि आज हे म्हणतात की, पाणी मी आणले. आज जर उरमोडी धरण झाले नसते तर माण-खटावला पाणी मिळाले असते का? तारळीचे पाणीही माण-खटावला दिले. तारळीसाठीही मी व अभयसिंहराजे महाराजसाहेबांनी बसून लाईन काढली. त्या धरणाची पुनर्रचना मी केली. म्हणून ते तारळी धरण झाले. खासदारांनी प्रेस घेऊन सांगितले की, निरा-देवघर धरणाला ३९०० कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. परंतु नीरा-देवघरचा काम राहिलंय बाकी फक्त २००० कोटी रुपयांचं मग उरलेल्या १९०० कोटी रुपयांचा काय नवीन कारखाना काढणार आहेत का? किती थापा मारायतायंत हे. आता जे झालंय ते धरणाची सुधारित प्रशासकीय मंजुरी आहे. या खासदारांना नीरा नदी कुठे आहे आणि भाटघर धरण कुठल्या नदीवर आहे, हे मला सांगावे. ते फक्त दमदाटीचे फोन करतात. कार्यकर्ते फोडायचा प्रयत्न करतात.
नीरा-देवघरमधून बचत झालेल्या ३ टीएमसी पाण्याचे वाटप फक्त फलटण-खंडाळा, फलटण-कोरेगाव आणि फलटण-माळशिरस या लाभक्षेत्रातच दिलं गेलं पाहिजे. त्यांचा आता हे पाणी त्यांच्या मतदारसंघात नेण्याचा प्रयत्न चालवला आहे. आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नका! हिम्मत असेल तर तुम्ही काहीतरी नवीन करून दाखवा, असे आवाहनही श्रीमंत रामराजेंनी खासदारांना केले. मोदींसाहेबांशी भांडून मी धोम-बलकवडी मिळवलं आहे. निरा-देवघर हे सरळ धरण आहे. धोम-बलकवडी हे वाकडे धरण आहे. ते मी बसवून घेतले आहे. हे जर मी केले नसते तर जिहे-कटापूर झाले नसते, असेही रामराजेंनी सांगितले.
आता रेल्वे आणली म्हणतात, एकदा टेस्टींग झाल्यानंतर रेल्वे मी काही पळलेली बघितली नाही. श्रीराम साखर कारखाना व साखरवाडी साखर कारखान्याला अवसायानातून मी बाहेर काढले. त्यांच्या चालवलेल्या कारखान्यात कामगारांना पगार नाहीत. उसाला योग्य दर दिला जात नाही.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना श्रीमंत रामराजे म्हणाले की, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत निरा-देवघरचा मुद्दा उठणार आहे. त्याच्यावर निवडणुका होणार आहेत. आपण त्यासाठी कामाला लागले पाहिजे. आज त्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे, असे समजा!
यावेळी शेतकर्यांना उद्देशून ते म्हणाले की, आता आपल्याला कापसाकडे वळावे लागणार आहे. दुष्काळी भागात कापूसच जास्त पैसे देत होता. उसापेक्षा कापूसच आता तुम्हाला पैसे मिळवून देणार आहे. उसाच्या शेतीत जास्त पाण्यामुळे जमिनी खराब होऊ लागल्या आहेत. आता आधुनिक शेती करावी लागणार आहे. जागतिक तापमान वाढीमुळे हवामानात बदल झाल्यामुळे आता पिकांमध्येही बदल करावा लागणार आहे. पूर्वीसारखे ऋतु आता राहिलेले नाहीत. पाऊस केव्हाही पडतो आहे. शेतीचाच अभ्यास करा, तीच तुम्हाला तारणार आहे. अदानीसारखा माणूस आज भिकेला लागला आहे. त्याच्यामुळे एलआयसीत गुंतवणूक केलेले धोक्यात आले आहेत.
या मेळाव्यात आ. दीपक चव्हाण, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनीही शेतकर्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्यातील पदाधिकारी, संस्थांचे पदाधिकारी व तालुक्यातील दक्षिण भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.