खासदार उदयनराजे, जिल्हा बॅंक निवडणूक अन त्यांचा फलटण दौरा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ नोव्हेंबर २०२१ । फलटण । भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आजच्या फलटण दौर्याची चर्चा सध्या तालुक्यासह जिल्ह्यामध्ये जोरात सुरू आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीचे घमासान सध्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे. जिल्हा बॅंकेमध्ये राजकारण न आणता पक्षविरहीत बॅंक ठेवण्यासाठी सध्याचे जिल्हा बँकेतील सत्ताधारी प्रयत्नशील आहेत. तर सत्ताधार्यांच्या विरोधात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व जयकुमार गोरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आव्हान निर्माण केलेले आहे. दि. १० रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्या प्राश्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी फलटण तालुक्याचा दौरा केला असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेतली त्यासोबतच श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, समशेरसिंह नाईक निंबाळकर, दिगंबर आगवणे व फलटण तालुक्यातील काही पदाधिकाऱ्यांची फलटण येथील शासकीय विश्रामगृहामध्ये भेट घेतली.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेवर विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे. जिल्हा बँकेमध्ये पक्ष न आणता बँकेचे कामकाज उत्कृष्ठ चालावे यासाठी पक्षविरहित पॅनल तयार करण्यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली ना. बाळासाहेब पाटील, आमदार छत्रपती श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवर आग्रही असल्याचे दिसत आहे. मात्र या सर्वसमावेशक पॅनलमध्ये खासदार छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले यांना घ्यायचे का नाही याबाबत अजूनतरी कोणताही निर्णय झालेला दिसून येत नाही. खासदार छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले यांनी फलटणमध्ये येऊन फक्त श्रीमंत रामराजे, श्रीमंत संजीवराजे यांचीच भेट न घेता समशेरसिंह नाईक निंबाळकर, दिगंबर आगवणे व दिलीपसिंह भोसले यांची सुद्धा भेट घेतल्याने विविध चर्चाना उधाण आलेले आहे.

विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना सर्वपक्षीय पॅनलमध्ये घेण्याबाबतचा निर्णय आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर सोपवून या दोघांतील कलगीतूरा पेटवून दिलेला आहे. त्यातूनच खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा संघर्ष जिल्हा बॅंक आणि आगामी सातारा पालिका निवडणुकीसाठी सुरु आहे. नुकत्याच जिल्हा बॅंकेत झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत गृहनिर्माण संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादीने उमेदवार घोषित करावा, त्याला साताऱ्यातील सर्व मते आम्ही देऊ असा इशारा दिलेला आहे. या सर्व घडामोडींवर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज फलटणमध्ये येवून विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, समशेरसिंह नाईक निंबाळकर, दिलीपसिंह भोसले व दिगंबर आगवणे यांची भेट घेतली. त्यामुळे जिल्हा बँक निवडणूक लक्षवेधक ठरणार आहे.

श्रीमंत उदयनराजे थेट विरोधी उमेदवाराच्या घरी

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये खासदार छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या विरोधात फलटणचे माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आजच्या फलटण भेटीत खासदार छत्रपती श्रीमंत उदयनराजे यांनी दिलीपसिंह भोसले यांच्या म्हणजेच थेट आपल्या विरोधी उमेदवाराच्या घरी जावून सदिच्छा भेट दिलेली आहे. नक्की त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली हे समजू शकलेले नाही. परंतु या भेटीमुळे आगामी काळामध्ये दिलीपसिंह भोसले हे आपला उमेदवारी अर्ज माघारी घेणार कि ठेवणार या कडे आता लक्ष लागून राहिलेले आहे.

गृहनिर्माणचे फलटण तालुक्यात १३ मतदार

फलटण तालुक्यामध्ये सातारा जिल्हा बँकेच्या गृहनिर्माण मतदारसंघातील १३ मते आहेत. खासदार छत्रपती श्रीमंत उदयनराजे यांच्या फलटण दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील १३ मतदारांपर्यंत खासदार उदयनराजे भोसले हे पोहचले कि फक्त सर्व पक्षीय पॅनलच्या नेतेमंडळींना पूर्ण ताकदीने आपण निवडणूक लढण्यास सज्ज आहोत, असा अप्रत्यक्ष इशारा तर खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला नसेल ना ? या बाबत सुद्धा विविध चर्चा आजच्या दौऱ्याच्या निमित्ताने रंगू लागलेल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!