स्थैर्य, फलटण, दि. १२: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांची तब्येत उत्तम असून त्यांना नुकतेच ब्रिच कँडी रुग्णालयातून उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. आता त्यांची प्रकृती उत्तम असून कोरोनाच्या महामारी काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला सावरण्यासाठी खा. शरद पवार पुन्हा एकदा सज्ज झाले असल्याचे महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
खा. शरद पवार यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्यानंतर विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. खा. शरद पवार यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून सातारा जिल्ह्यातील कोरोना बाबतचा आढावा घेतला. सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या उपाय योजनांमध्ये कसलीही कमतरता पडू देवू नका, अशा स्पष्ट सूचनाही यावेळी खा. शरद पवार यांनी त्यांना दिल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांच्यावर मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून त्यानंतर ही तपासणी साठी त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापूर्वी गेल्याच महिन्यात खा. शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात त्यावेळी त्यांच्यावर एन्डोस्कोपी करुन त्यांच्या पित्तनलिकेतील खडा काढून टाकण्यात आला होता.