दैनिक स्थैर्य । दि. २७ सप्टेंबर २०२१ । फलटण । पुणे ते बेंगलोर हा नवीन हरित महामार्ग बांधला जाणार आहे. पुणे – फलटण – बेळगाव – बंगळुरू असा हा मार्ग जाईल, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच पुणे येथील समारंभादरम्यान केली. त्यानंतर लगेचच माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांचे आभार मानले. सदरील महामार्गामुळे फलटण तालुक्यामध्ये रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील व त्या अनुषंगाने विविध व्यवसाय सुद्धा फलटणमध्ये येतील, असा हा महामार्ग फलटण मार्गे मंजूर केल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांचे आभार माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मानले.
या बाबत अधिक माहिती देताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले कि, फलटण तालुक्यामध्ये औद्योकीकरण वाढण्यासाठी व विविध उद्योग धंदे फलटण तालुक्यामध्ये येण्यासाठी मी खासदार झाल्यापासून सातत्याने पाठपुरावा करीत आहे. त्या मध्ये फलटण ते पुणे रेल्वे सुरु करण्यामध्ये देशाचे पंत्रप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन रेल्वे मंत्री व विद्यमान वाणिज्य मंत्री ना. पियुष गोयल, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाद्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून यश सुद्धा आले व फलटण ते पुणे हि रेल्वे सेवा सुरु सुद्धा करण्यात आली. या सोबतच पुणे ते पंढरपूर्ण रेल्वे मार्गाचे सर्वेक्षणाचे काम सुरु झालेले आहे. नव्याने प्रस्तावित पुणे ते बंगलोर हा हरित महामार्ग झाल्याने पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व बेंगलोर हे जिल्हे एकमेकांना नव्याने जोडले जातील. त्यामुळे व्यवसाय, औद्योगिकरण वाढीसाठी सदरील हरित महामार्ग हा नक्कीच फलटणचा कायापालट करेल अशी खात्री आहे.