
स्थैर्य, 4 फेब्रुवारी, सातारा : सातारा जिल्हामध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील यांना ’सर्वोकृष्ट चेअरमन’, तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांना ’सर्वोकृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी’ या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.इव्हेंटलिस्ट कॉन्फरन्स आणि ई प्लस इंटेलेक्चुअल मीडिया या नामांकित कंपनीमार्फत बँकिंग क्षेत्रामध्ये भरीव व उल्लेखनीय कामगिरी करणार्या संस्था व व्यक्ती यांच्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन गौरविले जाते. त्यांच्याकडून हा सन्मान झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन रिझर्व्ह बँक आणि नाबार्डचे संचालक सतीश मराठे यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमात इंडियन बँकिंग असोसिएशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल भगत यांच्या हस्ते खासदार नितीन पाटील यांना सर्वोत्कृष्ट चेअरमन आणि डॉ. राजेंद्र सरकाळे यांना पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी पोलिस सहआयुक्तसंजय शिंदे यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी खासदार पाटील म्हणाले, सहकारी बँकांचे देशाच्या ग्रामीण विकासात फार मोठे योगदान आहे. आदर्शवत व उज्ज्वल परंपरा, पारदर्शक कारभार तसेच उत्कृष्ट कार्यप्रणाली यामुळे बँकेची ख्याती राज्याबरोबरच देशातही झाली आहे. या पुरस्काराने बँकेच्या नावलौकिकात आणखी भर पडली आहे.
डॉ. सरकाळे यांनी तीसपेक्षा जास्त देशांचा बँकिंग व शेतीविषयक अभ्यास दौरा केला असून, शेतीविषयक पाच पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. बँकेच्यामाध्यमातून कार्यान्वित केलेल्या विविध योजनांची परिणामकारक अंमलबजावणी केली आहे. यातून शेतकर्यांचे आर्थिक जीवनमान आणि ग्रामीण भागातही कृषी क्रांती दृष्टिक्षेपात येत आहे. त्याबद्दल त्यांना ’सर्वोकृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
या पुरस्काराबद्दल बँकेचे ज्येष्ठ संचालक रामराजे नाईक-निंबाळकर, संचालक व मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, खासदार उदयनराजे भोसले, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, तसेच सर्व संचालक, सदस्य यांनी अभिनंदन केले.

