
स्थैर्य, फलटण, दि. १५ ऑक्टोबर : माढा लोकसभा मतदारसंघातील सिंचन आणि रेल्वेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन निरा देवघर प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्याची आणि पंढरपूर-लोणंद व जेजुरी-आष्टी रेल्वे प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली.
श्रीपूर येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यात कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि कारखान्याच्या विस्तारीकरण प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी खासदार मोहिते पाटील यांनी संधी साधून मतदारसंघातील प्रमुख समस्या मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
खासदार मोहिते पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निरा देवघर धरणाचे १३ टीएमसी क्षमतेचे बांधकाम २००७ सालीच पूर्ण झाले आहे. मात्र, निधीअभावी वितरण जाळे (Distribution Network) अद्याप पूर्ण झालेले नाही. सार्वजनिक गुंतवणूक मंडळाची (PIB) बैठक न झाल्याने निधी अडकला असून, याचा थेट फटका फलटण आणि माळशिरस तालुक्यातील सुमारे २५,००० हेक्टर दुष्काळी भागाला बसत आहे. या भागातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून प्रकल्पाच्या पाण्यापासून वंचित आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत या प्रकल्पासाठी निधी मिळावा, यासाठी सार्वजनिक गुंतवणूक मंडळाची तातडीने बैठक आयोजित करण्याकरिता केंद्राकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती त्यांनी केली.
दुसऱ्या निवेदनात त्यांनी पश्चिम महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पंढरपूर-लोणंद आणि जेजुरी-आष्टी या दीर्घकाळ प्रलंबित रेल्वे प्रकल्पांचा मुद्दा मांडला. हे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यास सोलापूर, सातारा, पुणे, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या दळणवळणाचा आणि मालवाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, तसेच पंढरपूरला येणाऱ्या भाविकांची सोय होऊन मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील संपर्क वाढेल. राज्य सरकारकडून तांत्रिक मान्यता मिळूनही निधीअभावी हे प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने केंद्र शासनाच्या रेल्वे मंत्रालयाशी समन्वय साधून आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
या दोन्ही प्रकल्पांमुळे राज्यातील दळणवळण सुविधेत ऐतिहासिक सुधारणा होऊन हजारो नागरिकांना रोजगार आणि आर्थिक विकासाच्या संधी उपलब्ध होतील, असेही खासदार मोहिते पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे.
या कार्यक्रमासाठी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह जिल्ह्यातील अनेक प्रमुख नेते आणि मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी खासदार मोहिते पाटील यांची निवेदने स्वीकारली असून, त्यावर सकारात्मक कार्यवाही होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.