
स्थैर्य, फलटण, दि. १७ सप्टेंबर : फलटण नगरपरिषदेचे नूतन मुख्याधिकारी म्हणून निखिल जाधव यांनी नुकताच आपला पदभार स्वीकारला आहे. प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आणि पाचगणी सारख्या पर्यटनस्थळाचा कायापालट केल्याची यशस्वी कामगिरी सोबत घेऊन आलेल्या जाधव यांच्या नियुक्तीने फलटणवासीयांच्या मनात मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. मात्र, शहराला भेडसावणाऱ्या अनेक गंभीर समस्यांचे निराकरण करणे, हे त्यांच्यापुढील मोठे आव्हान असणार आहे.
शहरातील नागरिकांना सध्या अनेक मुलभूत समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक भागांतील विस्कळीत पाणीपुरवठा हा त्यातीलच एक महत्त्वाचा मुद्दा आहे. यामुळे गृहिणींचे दैनंदिन नियोजन कोलमडत आहे. यासोबतच, शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, खड्ड्यांमुळे अपघात होण्याचा धोका वाढला आहे. हे खड्डे केवळ तात्पुरते न बुजवता, त्यांचे दर्जेदार आणि दीर्घकाळ टिकणारे काम होणे आवश्यक आहे.
नगरपरिषदेच्या प्रशासकीय कामकाजातील दिरंगाईचा फटकाही नागरिकांना बसत आहे. जन्म-मृत्यू नोंदणी विभागात हजारो दाखले प्रलंबित असून, ‘ओळख’ असल्याशिवाय काम होत नसल्याच्या तक्रारी अनेकदा ऐकायला मिळतात. या कामकाजात सुसूत्रता आणून नागरिकांची होणारी हेळसांड थांबवणे, हे एक महत्त्वाचे काम मुख्याधिकारी जाधव यांना करावे लागणार आहे.
फलटण शहरातील वाहतूक आणि पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. बाजारपेठेत आणि मुख्य रस्त्यांवर पार्किंगचे पट्टे ओढूनही बेशिस्तपणे वाहने लावली जातात, ज्यामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. नगरपरिषदेकडे टोईंग वाहन उपलब्ध असूनही त्याचा प्रभावी वापर होताना दिसत नाही. पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने पार्किंगला कठोर शिस्त लावण्याची गरज आहे.
या सर्व समस्यांबरोबरच स्वच्छतेचा प्रश्नही गंभीर आहे. शहरातील महिला स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत दयनीय आहे, तर पुरुषांच्या मुताऱ्यांचीही नियमित स्वच्छता होत नाही. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात, ज्यामुळे शहराच्या प्रतिमेला धक्का बसत आहे आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘स्वच्छ फलटण, सुंदर फलटण’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मोठ्या इच्छाशक्तीची गरज आहे.
निखिल जाधव यांची पार्श्वभूमी मात्र फलटणकरांसाठी आशादायक आहे. मूळचे बीड जिल्ह्यातील असलेले जाधव हे २०१५ साली शासकीय सेवेत रुजू झाले. त्यांनी यापूर्वी पाचगणी येथे मुख्याधिकारी म्हणून काम करताना ‘स्वच्छ सर्वेक्षण’ मध्ये देशाला दिशा देणारी कामगिरी केली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली पाचगणी नगरपरिषदेने देशात अव्वल क्रमांक पटकावला होता. प्रशासकीय कौशल्य, योग्य नियोजन आणि नागरिकांचा सहभाग या त्रिसूत्रीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले होते.
पाचगणी व्यतिरिक्त त्यांनी खंडाळा नगरपंचायत, कुरुंदवाड नगरपरिषद आणि सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत उपायुक्त अशा महत्त्वाच्या पदांवरही काम केले आहे. त्यांच्या याच अनुभवाच्या आणि दूरदृष्टीच्या जोरावर, ते ‘पाचगणी पॅटर्न’ फलटण शहरात यशस्वीपणे राबवतील आणि शहराला विकासाच्या नव्या वाटेवर घेऊन जातील, असा दृढ विश्वास फलटणमधील नागरिक व्यक्त करत आहेत.