नवनियुक्त पोलीस उपअधीक्षक विशाल खांबे यांच्यासमोर आव्हानांचे डोंगर; प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची अपेक्षा

बंद सीसीटीव्ही, वाहतूक कोंडी आणि ग्रामीण भागातील वाढत्या चोऱ्या रोखण्याचे प्रमुख आव्हान


स्थैर्य, फलटण, दि. 11 सप्टेंबर : फलटणचे नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून विशाल खांबे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच तालुक्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

यामध्ये सर्वात प्रमुख आव्हान आहे ते म्हणजे फलटण शहरातील बंद अवस्थेत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे. काही वर्षांपूर्वी बसवण्यात आलेले हे कॅमेरे सध्या पूर्णपणे बंद असल्याने पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ निकामी झाला आहे. शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी हे कॅमेरे तातडीने सुरू करणे आवश्यक असून, यासाठी फलटण नगरपरिषदेशी समन्वय साधून तोडगा काढणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दुसरे मोठे आव्हान म्हणजे शहरातील वाहतूक कोंडी. जिंती नाका, नाना पाटील चौक, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक (पृथ्वी चौक) आणि गिरवी नाका यांसारख्या प्रमुख चौकांमध्ये दररोज वाहतूक कोंडी होत असून, त्यामुळे लहान-मोठे अपघात नित्याचे झाले आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

शहरबरोबरच ग्रामीण भागातील गुन्हेगारी रोखण्याचेही आव्हान खांबे यांच्यासमोर आहे. साखरवाडी, कोळकी, विडणी यांसारख्या तालुक्याच्या मोठ्या गावांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. येथील चोऱ्या आटोक्यात आणून ग्रामस्थांना सुरक्षितता प्रदान करणे, हे देखील पोलिसांपुढील महत्त्वाचे काम असणार आहे. या सर्व समस्यांवर नवनियुक्त पोलीस उपअधीक्षक विशाल खांबे काय उपाययोजना करतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.


Back to top button
Don`t copy text!