
स्थैर्य, फलटण, दि. ०८ सप्टेंबर : शहरातील एस.टी. स्टँड परिसरातून एका छायाचित्रकाराची मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका संशयितावर फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष रामचंद्र तांबे (वय ४१, व्यवसाय- फोटोग्राफर, रा. वडजल, ता. फलटण) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तांबे यांनी ५ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास त्यांची काळ्या व लाल रंगाची एच.एफ. डिलक्स मोटारसायकल (क्र. MH 11BT 9101) एस.टी. स्टँड येथील दिव्या फोटो स्टुडिओसमोर उभी केली होती.
सुमारे वीस मिनिटांनी ते परत आले असता, त्यांना त्यांची मोटारसायकल जागेवर दिसली नाही. त्यांनी परिसरात शोधाशोध केली असता, जवळच असलेल्या जोगेश्वरी मिसळ केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये एक इसम त्यांची मोटारसायकल घेऊन जाताना दिसला. फिर्यादीने त्यास ओळखले असून, तो अंकुश लाला चव्हाण (रा. ठाकुरकी, ता. फलटण) असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
संतोष तांबे यांच्या तक्रारीवरून, फलटण शहर पोलिसांनी संशयित आरोपी अंकुश चव्हाण याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार पूनम वाघ करत आहेत.