
स्थैर्य, फलटण, दि. ११ सप्टेंबर : शहरातील विरदेवनगर येथील एका अपार्टमेंटच्या पार्किंगमधून भरदिवसा मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरज बाळासाहेब जाधव (वय ३०, रा. विरदेवनगर, फलटण) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादी जाधव यांनी ७ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांची पांढऱ्या रंगाची होंडा ॲव्हेएटर मोटारसायकल (क्र. MH 11 CN 0570) प्रणित स्टार अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी करून हँडल लॉक केले होते.
त्याच दिवशी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ते कामानिमित्त पार्किंगमध्ये आले असता, त्यांना त्यांची मोटारसायकल जागेवर दिसली नाही. त्यांनी परिसरात शोधाशोध केली, मात्र ती सापडली नाही. अखेर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मोटारसायकल चोरून नेल्याची खात्री झाल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून, फलटण शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार अमोल रणवरे करत आहेत.