पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते विधीवत पूजन : एसटी बसद्वारे पालखीचे प्रस्थान
स्थैर्य, अमरावती, दि. 30 : गत सव्वाचारशे वर्षांची परंपरा असलेल्या कौंडण्यपुरातील रुक्मिणीमातेच्या पालखीचे आज एसटी बसद्वारे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते माता रूक्मिणीच्या पालखीचे विधीवत पूजन होऊन पालखी रवाना झाली. यावेळी ‘जयहरी विठ्ठल’च्या जयघोषात विदर्भाची पंढरी कौंडण्यपूरनगरी दुमदुमून गेली होती.
शतकानुशतकांची परंपरा असलेल्या व विविध शतकांतील संत-महात्म्यांच्या सहवासाने पुनित झालेली ही पालखी परंपरा कोरोना संकटकाळातही अखंडित राहिली. आज सकाळी दहाच्या सुमारास 20 वारकऱ्यांचा समावेश असलेली ही पालखी एसटी बसने आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला रवाना झाली.
जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज सकाळी रुक्मिणी मातेच्या पादुकांचे विधिवत पूजन करण्यात आले. मंदिरापासून पालखी मार्गक्रमण करत गावाच्या वेशीपर्यंत आणण्यात आली व नंतर 20 वारक-यांसोबत पादुका पंढरपूरकडे रवाना करण्यात आली. विठ्ठल-रुक्मिणीनामाच्या जयघोषाने यावेळी आसमंत दुमदूमून गेला होता. पालखी सोहळ्यात वारक-यांचा उत्साह आणि आनंदाचे वातावरण होते. पालकमंत्र्यांनीही यावेळी फुगडी खेळली. ‘माऊली माऊली’च्या जयघोषाने अवघी कौंडण्यपूर नगरी चैतन्यमय झाली होती.
येथून दरवर्षी तीनशेहून अधिक वारकरी पायी पालखी घेऊन निघतात. पुढेही ठिकठिकाणी शेकडो वारकरी बांधव या पालखीशी जोडले जातात. यंदा कोरोना संकटकाळ लक्षात घेऊन दक्षतेच्या अनुषंगाने 20 वारकरी रवाना झाले आहेत. सव्वाचारशे वर्षांची प्रदीर्घ परंपरा आणि विविध शतकांतील संत महात्म्यांच्या सहवासाने पुनित झालेली ही पालखी केवळ विदर्भातीलच नव्हे, तर समस्त महाराष्ट्रातील लोकांच्या श्रद्धेचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे कोरोना संकट आले तरी ही परंपरा खंडित झाली नाही. योग्य ती दक्षता घेऊन पालखी आज रवाना झाली याचा खूप आनंद आहे, अशी भावना पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केली.
श्री क्षेत्र कौंडण्यपूर हे श्रीकृष्णपत्नी रुक्मिणीचे माहेर आहे. येथे कार्तिकी एकादशीला मोठी यात्रा भरते. आषाढी एकादशीला येथून सुमारे 425 वर्षांपासून पालखी पंढरपूरला जाते. रुक्मिणी मातेची पालखी ही पहिली मानाची पालखी मानली जाते. आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त दि. 1 जुलै रोजी आषाढी यात्रा श्री क्षेत्र पंढरपूर येथे भरणार आहे. यात्रेत प्रमुख संतांच्या पादुकांचा श्री पांडुरंगास भेटीचा सोहळा असतो. त्यानिमित्त राज्यभरातून पालख्या पंढरपूरला येत असतात. सध्याचे कोरोना महासंकट लक्षात घेऊन पालख्यांवर काहीशी मर्यादा आली, मात्र महत्वाच्या पालख्यांना योग्य ती दक्षता घेऊन पालखी आणण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे.
कौंडण्यपूर येथील सव्वाचारशे वर्षांची प्राचीन परंपरा लक्षात घेऊन ही परंपरा अखंडित राहावी यासाठी शासनाची मान्यता मिळविण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी प्रयत्न केले. त्यानुसार शासनाने मान्यता दिली असून, विदर्भातील ही प्राचीन पालखी परंपरा अबाधित राहिली. आई रुक्मिणीची पालखी यंदाही पंढरपूरला रवाना झाल्याने विदर्भातील वारकरी, भाविकांकडून आनंद व्यक्त होत आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कौंडण्यपूरमध्ये भाविकांनी गर्दी न करता घरुनच माता रुक्मिणीचे दर्शन घेण्याचे आवाहन कौंडण्यपूर मंदिर प्रशासनाने भाविकांना केले आहे.